आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्याचे वातावरण असहिष्णूतेच्या पुढे- अरूंधती राय यांची मोदी सरकारवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सध्याचे देशातील वातावरण हे असहिष्णूता म्हणण्यापेक्षाही घातक आहे. कोणी काय खावे यावरून या देशात हत्या होत असेल तर असहिष्णूता शब्द कमी पडतोय अशा शब्दात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका अरूंधती राय यांनी मोदी सरकारवर टीका केली.
सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि पुरोगामी विचारसरणीचा सातत्याने पुरस्कार करणारे समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांची आज 125 वा स्मृतिदिन आहे. यादिनी अरुंधती रॉय यांना आज सकाळी पुण्यातील फुले वाड्यात महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते राय यांना पुरस्कार प्रदान देण्यात आला. त्यावेळी राय बोलत होत्या.
देशातील सद्य स्थितीवर भाष्य करताना राय म्हणाल्या, सध्या देशात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अनेक लोक भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. सध्याच्या सरकारमधील लोकच भारत हे हिंदु राष्ट्र आहे असे सांगत आहेत. अशा बाबींमुळेच देशातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. कोणी खाय खावे, कसले कपडे घालावेत हे तुम्ही ठरवणार आहात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दादरी हत्याकांडाचा उल्लेख करून राय म्हणाल्या की, देशातील सध्याचे वातावरण असहिष्णू असल्याचे म्हटले जात आहे. पण माझे म्हणणे त्याच्या पुढे आहे. सध्याचे वातावरण असहिष्णू म्हणण्याच्या पलीकडे पोहचले आहे असे सांगत देशातील दलित, अल्पसंख्याक व बहुजन असुरक्षित आहेत. महात्मा फुलेंनी हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा याच्यावर आसूड ओढले. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यामुळेच केली होती. आंबेडकर यांनीही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला, मात्र आता फुले- आंबेडकरांना हिंदुत्त्ववादाशी जोडले जात आहे. यामागे सरकारचा काही विशिष्ट हेतू आहे असेही राय यांनी सांगितले.
दरम्यान, अरूंधती राय यांना महात्मा फुले समता परिषदेचा पुरस्कार देण्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (अभाविप)च्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. फुले वाड्यात राय यांच्या विरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच निदर्शने केली. कार्यक्रमस्थळी तणाव वाढताच पोलिसांनी अभाविपच्या 10-15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.