आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आर्य-अनार्य’ हे ब्रिटिशांनी माजवलेले खूळ, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डाॅ. वसंत शिंदे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘बाहेरून आलेल्या आर्यांनी भारतीय संस्कृती नष्ट केल्याचा विचार ब्रिटिशांनी या देशात रुजवला. मात्र उत्खननातून नव्याने समोर येणाऱ्या पुराव्यांमुळे अनेक जुनी गृहीतके चुकीची असल्याचे सिद्ध होत आहे. ‘आर्य-अनार्य’ हा वादसुद्धा मागे पडणार आहे. पुरातन भारतीय संस्कृती याच मातीतली आहे. गेल्या दहा हजार वर्षांत बाहेरून येऊन येथे कोणी संस्कृती लादल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. ब्रिटिशांनी वेगवेगळी मते मांडून निर्माण केलेला हा संभ्रम आहे, असे मत डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक संजय सोनवणी यांच्या ‘ओरिजिन्स ऑफ वैदिक रिलिजन अँड इंडस- घग्गर सिव्हिलायझेशन’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. या वेळी अध्यक्षपदावरून डॉ. शिंदे बोलत होते. पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. हरी नरके, प्रा. श्रृती तांबे, आ. कपिल पाटील, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे या वेळी उपस्थित होते. धोलाविरा हे सध्या वाळवंटात असणारे ठिकाण जलनियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण होते, असे डॉ. शिंदे म्हणाले. ‘काही हजार वर्षांपूर्वीदेखील येथे पाणी कमीच असावे. मात्र तत्कालीन नियोजनकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीखाली पाणी साठवण्याचे हौद बांधले. ते एकमेकांशी जोडलेले होते. या माध्यमातून वर्षभर पाणीपुरवठा होत असे. हडप्पा संस्कृतीने लाख स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रावर साम्राज्य निर्माण केल्याचे पुरावे आढळतात. मात्र त्यात राजेशाही नसून लोकशाही नांदत असणार. लढाया झाल्याचे पुरावे कुठे मिळत नाहीत.’ आर्य बाहेरून आल्याचे सांगत मूलनिवासी सिद्धांत मांडून विशिष्ट समुदायाच्या कत्तली करण्याची मांडणी काही संघटना करतात. फुले-आंबेडकरांच्या नावावर चालणाऱ्या या छावण्या स्वतःला सोईचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात, असे डॉ. नरके यांनी स्पष्ट केले.

हवामान बदलामुळे लोप : ‘समृद्ध,प्रगत हडाप्पा संस्कृती नाश कशी पावली? गुजरात-हरियाणात उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांनुसार इसवीसनपूर्व दोन हजारमध्ये येथील वातावरण शुष्क होत गेले. सौराष्ट्रातल्या समुद्राची पातळी 3 मीटरने घसरली. हडप्पा संस्कृतीतली 30 बंदरे बंद पडली. परदेशी व्यापार थांबल्याने संपत्तीचा ओघ आटला. इसवीसनपूर्व दोन हजारनंतरच घग्गर नदी शुष्क पडली. हीच गुप्त झालेली ‘सरस्वती नदी’ असल्याचे संदर्भ आढळतात. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे हडप्पा संस्कृतीतल्या लोकांचे स्थलांतर गंगेच्या खोऱ्यात झाले. हवामान बदलांमुळे हडप्पा संस्कृती नाश पावल्याचे पुरावे आढळत आहेत, असे मत डॉ. वसंत शिंदे यांनी व्यक्त केले.

‘मूलनिवासी’ : निरर्थक सिद्धांत
‘आर्यबाहेरुन आल्याचा सिद्धांत आपल्याकडे आग्रहाने मांडला गेला. त्यामुळे द्रविडांचा राष्ट्रवाद दक्षिणेत वेगाने फोफावला. आर्यवादामुळे ते उत्तरेचा द्वेष करु लागले. भारतीय संस्कृतीने आर्यांचे अनुकरण केल्याचे गृहीत धरुनच वैचारीक मांडणी केली जाते. आर्य सिद्धांतामुळे ‘मूलनिवासी’ हा नवा सिद्धांत पुढे आणला गेला. याचा उपयोग काही संघटनांनी फक्त विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केला. पण यातून वैदिक शहाणे झाले नाहीत. युरोपीय लोकांचा श्रेष्ठतावाद लादण्याचे प्रयत्न त्यांनी चालूच ठेवले. वास्तविक भारतीय संस्कृती याच मातीतली आहे. वर्चस्ववाद, विद्वेषाची भूमिका सोडून भारतीय समाजाने ‘एकमय’ होण्याची गरज आहे. यादृष्टीने वैदिकांचे उगमस्थान, वेद आणि अवेस्ताचे भौगोलिक स्थान, सिंधू-घग्गर नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती आदींबाबतचे विस्तृत विवेचन उपलब्ध पुराव्यांनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे मत लेखक संजय सोनवणी यांनी मांडले.