आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींच्या पालखी रथाचा मान जिवा-शिवा बैलजोडीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आषाढी वारीसाठी यंदा संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखीरथ ओढण्याचा मान रानवडे घराण्यातील जिवा-शिवा या बैलजोडीला मिळणार आहे. माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून 20 जूनला प्रस्थान करणार आहे.
आळंदी येथे सोहळ्याच्या बैलजोडी निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माउलींच्या पालखीरथाचा मान परंपरागत पद्धतीने कुर्‍हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले आणि वाखडे कुटुंबीयांकडे आहे. यापूर्वी 2009 मध्येही याच बैलजोडीने माउलींचा रथ ओढला होता. जिवा-शिवा या बैलजोडीची खरेदी रानवडे कुटुंबीयांनी सातारा येथील बाजारातून एक लाख 30 हजार रुपयांना केली होती. नवीन असूनही पहिल्याच वर्षी या बैलजोडीने रथ सर्मथपणे वाहून नेला होता. आता तर माउलींचा रथ हायटेक केल्याने रथाचे ओझेही कमी झाले आहे. त्यामुळे वारी मार्गावरील सर्वात अवघड टप्पा मानल्या जाणार्‍या दिवे घाटातूनही रथ सहजपणे खेचला जातो. रथ ओढणार्‍या बैलजोडीला अतिरिक्त र्शम पडू नयेत, याचीही काळजी घेतली जाते.
जिवा-शिवाची विशेष काळजी
माउलींच्या पालखीरथाचा मान मिळाल्याने बैलजोडीचे मालक प्रदीप रानवडे आनंदित आहेत. ते म्हणाले, जिवा-शिवाला पालखी सोहळ्यासाठी निगुतीने तयार केले जात आहे. त्यांच्या आहाराची काळजी घेतली जात आहे. हिरवा चारा, ज्वारीचा कडबा, मक्याचा भरडा, मळलेले गव्हाचे पीठ आणि शेंगदाणा पेंड त्यांना खाऊ घातले जात आहे. बैलजोडीची नियमित वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.