आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan Said There Are Chances Of Mid Term Elections

अशोक चव्हाणांना "मध्यावधी'चे स्वप्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १० जुलैला आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘भाजपचे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवर होणारे आरोप पाहिल्यास मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येणार नाही. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला घरचा आहेर दिलाच आहे. सावंतांना आता आम्ही "आप आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं' असेच म्हणू,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिली. लोणावळा चिक्कीबद्दल खूप ऐकून होतो. मात्र, येथे आल्यानंतर या चिक्कीपेक्षा युती सरकारची चिक्कीच जास्त प्रसिद्ध असल्याचे दिसले, असा टोलाही त्यांनी लगावला.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बुधवारी लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणी झाली. बैठकीनंतर चव्हाणांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, खासदार रजनी पाटील, मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढल्या आहेत. त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. नुसत्या पोकळ घोषणांचा पाऊस युती सरकारकडून सुरू आहे. काँग्रेसने वेळोवेळी कर्जमाफीची मागणी केली. मात्र याचे गांभीर्य सरकारला नाही. या झोपलेल्या सरकारचे लक्ष शेतकरी समस्यांकडे वेधून घेण्यासाठीच ९ व १० जुलैला राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले अाहे.’

‘भाजपचे सरकार असंवेदनशील अाहे. या सरकारने जाणीवपूर्वक रमजान ईदच्या दिवशी म्हणजे १९ जुलैला महसूल लिपिक भरती ठेवली. वास्तविक दिवाळी, ईद अशा सणांना सरकारी परीक्षा न ठेवण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचा याला विरोध असून ही तारीख बदलण्यास आम्ही सरकारला भाग पाडू,’ असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

‘पावसाळी अधिवेशनात फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस निर्णय न घेतल्यास अधिवेशन चालू दिले जाणार नाही,’ असा इशारा देतानाच यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्रपक्षांची मदत घेतली जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राणे, विखे पाटील, पृथ्वीराज यांची दांडी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यासह काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोणावळ्याच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. या नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत चव्हाण खुलासा करू शकले नाहीत. विखे-पाटील यांना मात्र त्यांनी िचमटा काढला. ते म्हणाले, "बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला गेले आहेत. विमान एक तास लेट झाले नसते तर कदाचित ते मुख्यमंत्र्यांबरोबरच गेले असते. बाकी सरकारी दौऱ्याशी त्यांचा संबंध नाही.’