आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आजी’चा कधीतरी माजी होत असताेच; कुंडल्यांची भीती नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘राजकारणात कोणीच कायमचा नसतो. ‘आजी’ हा कधी ना कधी ‘माजी’ होत असतो हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणाच्या कसल्या कुंडल्या आहेत याची काळजी करण्याची गरज वाटत नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

‘विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे असून योग्य वेळी त्या बाहेर काढीन,’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. अशोक चव्हाण यांच्यावरदेखील आदर्श घोटाळ्याची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा इशारा तुम्हाला धमकीवजा वाटतो का, या प्रश्नावर चव्हाण बोलत होते. ‘माहिती अधिकार कायद्यामुळे आता सामान्य माणसांच्या हाती सर्वांच्याच कुंडल्या आल्या आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी शुक्रवारी पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘गेल्या दोन वर्षांत घोषणाबाजी करण्याशिवाय युती सरकारने काही केले नाही. घोषणा-योजना फक्त कागदावर दिसतात. त्यांची अंमलबजावणी झाली नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मूकमोर्चे निघाले म्हणून ईबीसीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. ओबीसी व इतर विद्यार्थ्यांसाठीचे बाराशे कोटी रुपयांचे शैक्षणिक शुल्क अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या नव्या प्रतिपूर्तीच्या घोषणा म्हणजे निव्वळ मलमपट्टी आहे. मराठा व मुस्लिमांना कायद्याने आरक्षण मिळत नाही तोवर वेळकाढूपणा करण्यासाठी सरकारने केलेली ही दिशाभूल आहे,’ असे चव्हाण म्हणाले. ‘सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली आहे. फक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच
डाळीची पाकिटे घेऊन टीव्हीवर दिसतात. सर्वसामान्य लोकांना स्वस्तात डाळ मिळत नाही,’ अशी टीका चव्हाण यांनी केली.
‘मुख्यमंत्र्यांवर मी व्यक्तिगत टीका करणार नाही, मात्र राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला तर कदाचित कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली हाताळली जाईल,’ असेही ते म्हणाले.

‘राष्ट्रवादी’च्या फायद्यासाठी जागावाटप नाही
दाेन महिन्यांत विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘राष्ट्रवादी’शी आघाडी केली होती. मात्र त्या वेळच्या जागावाटपात काँग्रेस दबावाला बळी पडली, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले होते. या वेळी काय होणार, असा प्रश्न केला असता अशाेक चव्हाण म्हणाले, ‘राष्ट्रवादीबरोबर गेल्या वेळी झालेल्या वाटाघाटींमध्ये मी सहभागी नव्हतो. या वेळी काय करायचे याची चर्चा करण्यासाठी शनिवारी मुंबईत काँग्रेसतर्फे मी, मोहन प्रकाश आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रफुल्ल पटेल यांच्यात प्राथमिक चर्चा होणार आहे. दोघांना समान लाभ मिळणारी व्यवहार्य भूमिका असेल तरच आम्ही त्यांच्याशी आघाडी करू. राष्ट्रवादीच्या फायद्यासाठी जागावाटप होणार नाही.’
मराठा माेर्चांमागे संघ नाही
राज्यात निघणाऱ्या मराठा मोर्चांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा दावा काही मराठा संघटनांनी केला आहे. याबद्दल विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, ‘मला असे वाटत नाही. मराठा मोर्चांमागे आरएसएस असल्याचा दावा मी करणार नाही. या मोर्चांना नेता नाही. कोणतीही एक संघटना, पक्ष यामागे नाही. मराठ्यांच्या उत्स्फूर्त मोर्चांमागे संघाचा हात असल्याचे म्हणणे योग्य ठरणार नाही.’
बातम्या आणखी आहेत...