आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस यंत्रणा सतर्क, स्थलांतर करू नका- आर. आर. यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ईशान्य भारतातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्यातील पोलिस सतर्क आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात परत यावे. या नागरिकांच्या संपर्कात येणा-या स्थानिक नागरिकांनी त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. या वेळी पोलिस आयुक्त गुलाब पोळ, सहआयुक्त संजीव सिंघल उपस्थित होते.
आसाममधील हिंसाचारानंतर घाबरलेले पूर्वांचल भागातील नागरिक महाराष्ट्र सोडून आपापल्या गावी परतत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा देण्यासाठी गृहमंत्री शुक्रवारी पुण्यात आले होते. ते म्हणाले की, ईशान्य भारतातील नागरिक शिक्षण व रोजगारानिमित्त राज्यात दाखल झाले आहे. त्यांच्यावर हल्ला करणा-या 15 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. या विद्यार्थ्यांची विशिष्ट शारीरिक ठेवण, भाषा, वागणूक या बाबींवरून कोणी टिंगल करत असल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. ज्या महाविद्यालयात, वसतिगृहात पूर्वांचलातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणी वातावरण निवळेपर्यंत पोलिस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणा-यांचा शोध घेतला जात आहे. असे सोशल नेटवर्क संकेतस्थळ बंद करण्याचा राज्य सरकारला कमी अधिकार असून त्याबाबत केंद्राला कळवण्यात आले आहे. केंद्राने परदेशात संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. मुंबई व पुण्यातील सायबर सेल अफवा पसरवणा-यांचा सखोल तपास करत आहे. पुणे सायबर सेलने याबाबत दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. फास्ट ट्रॅक न्यायालयात या केसेस चालवून आरोपींना लवकर शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. आसामींवरील हल्ल्यांबाबत कोणत्याही पोलिस चौकीने तक्रार दाखल करून न घेतल्यास संबंधित पोलिस अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.
पुण्यात ईशान्येतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून या गोंधळानंतर त्यांचा अभ्यास काही प्रमाणात बुडाला आहे. विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बोलणे करून या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासनही पाटीलयांनी दिले.
सोशल नेटवर्कवर लक्ष - सायबर सेलचे पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे म्हणाले, सोशल साइट्सच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याने फेसबुकच्या 25 लिंक बंद करण्यात आल्या आहेत. यू ट्यूबवरील 78 वादग्रस्त व्हिडिओ क्लिपपैकी पाच बंद करण्यात सायबर सेलला यश आले आहे. उर्वरित क्लिपवर अनावश्यक माहिती अशी नोट दिली आहे. 14 व 15 आॅगस्ट रोजी अफवा पसरवणा-या एमएमएसवर बंदी घालण्यात आल्याचे ते म्हणाले.
स्फोटांचा तपास वेगात- गृहमंत्री पाटील म्हणाले, पुण्यात झालेल्या साखळी स्फोटाबाबत दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) बैठक घेण्यात आली आहे. एटीएस प्रमुख राकेश मारिया पुण्यात तळ ठोकून असून तपास योग्य मार्गावर आहे. स्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याच्याबाबतचा खुलासा एटीएस करेल. ही घटना गंभीर असून लवकरच या घटनेचा उलगडा होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातून आणखी 500 जण रवाना
पुणे : आसाम हिंसाचारामुळे घाबरलेल्या पूर्वांचल भागातील सुमारे एक हजार नागरिक व विद्यार्थ्यांनी गेल्या तीन दिवसांत पुण्याहून स्थलांतर केले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिस व प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असतानाही त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी दिवसभरात आणखी 500 जणांनी आपल्या घरचा रस्ता धरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आसामकडे जाणा-या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन गुरुवारी आझाद हिंद एक्स्प्रेस या गाडीला पुण्यापासून तीन जादा डबे लावण्यात आले होते. शुक्रवारी सुद्धा मुंबई गुवाहाटी एक्स्प्रेस ही गाडी प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. रेल्वेस्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून रेल्वे गाड्यांमध्येही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.