आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Athwale Demand Marathi Food In Deccan Queen Express

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'डेक्कन क्वीन\'मध्येही मराठी पदार्थ हवेत- रामदास आठवले; आज पुण्यात आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: मुंबईतील एका हॉटेलात कांदेपोहेवर ताव मारताना खासदार रामदास आठवले व त्यांचे सहकारी)
पुणे- मुंबईतील सर्व प्रकारच्या हॉटेलात मराठी पदार्थ मिळावेत अशी मागणी मान्य झाल्यानंतर खासदार रामदास आठवले यांनी आता आपला मोर्चा पुणे-मुंबई 'डेक्कन क्वीन' एक्स्प्रेस या रेल्वेगाडीकडे वळविला आहे. डेक्कन क्वीनने रोज सकाळी हजारो प्रवाशी पुण्याकडून मुंबईकडे जात असतात. त्यावेळी या मराठीजणांना आपल्या आवडीचे व सवयीचे खाद्यपदार्थ मिळायला हवेत अशी मागणी खासदार आठवले यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य न केल्यास शुक्रवारी (5 जून) रोजी पुण्यातील रेल्वे स्टेशन्सवर आरपीआयतर्फे आंदोलन केले जाईल असेही आठवलेंनी स्पष्ट केले आहे.
मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीय पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत आणि मेनू कार्डमध्ये त्यांचा समावेश करावा अशी मागणी आठवलेंनी मागील पंधरवड्यात केली होती. तसेच 15 दिवसांच्या आत यावर निर्णय न झाल्यास महाराष्ट्रीयन पदार्थ न देणाऱ्या हॉटेलसमोर आरपीआय आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला होता. आठवलेंच्या मागणीचा सन्मान ठेवून यापुढील काळात राज्यातील सर्व हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीय पदार्थ मिळतील अशी ग्वाही मुंबईतील इंडियन हॉटेल एन्ड रेस्टॉरंटस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आठवलेंना दिली होती. याबद्दल मराठी जणांनी आठवलेंचे आभार मानले होते.

त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे डेक्कन क्वीनने नोकरीसाठी जाणा-या हजारो लोकांना आपल्या आवडीचे व मराठी पदार्थ मिळत नसल्याच्या तक्रारी आठवलेंकडे आल्या होत्या. आठवले यांनी या तक्रारीची खातरजमा करून डेक्कन क्वीनमध्येही मराठी पदार्थ मिळायला हवेत अशी मागणी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. बटाटा वडा, कांदेपोहे, समुसे, भजी हे पदार्थ मराठीजणांचे आवडीचे आहेत ते डेक्कन क्वीनमध्ये मिळालेच पाहिजेत अशी मागणी आठवले यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नाही. त्यामुळेच आठवले यांनी शुक्रवारी (5 जून रोजी) पुण्यातील मुख्य रेल्वे स्टेशनसमोर आरपीआयतर्फे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.