आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सायबर गुन्हेगारांच्या रडारवर एटीएम कार्डधारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी चलनातून पाचशे अाणि एक हजार रुपयांच्या नाेटा बाद केल्यानंतर नवीन नाेटा मिळवण्यासाठी देशभरातील बँका व एटीएम केंद्रांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत अाहेत. कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने नागरिक वाटचाल करत असतानाच सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या एटीएम कार्डवर लक्ष केंद्रित केले असून एटीएम कार्डद्वारे फसवणुकीच्या तक्रारींचा अाेघ सायबर गुन्हे शाखेकडे वाढत अाहे. पुण्यात वर्षभरात एटीएम कार्डद्वारे फसवणुकीच्या ५७५ तक्रारी दाखल झाल्या असून नाेटाबंदीनंतर त्यात दिवसेंदिवस वाढ होत अाहे.
पुण्यातील सायबर गुन्हे शाखेकडे १६८४ विविध प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यात एटीएम कार्डद्वारे फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण ३१ टक्के अाहे. क्रेडिट कार्डची गाेपनीय माहिती विचारून फसवणूक झालेल्या ५४७ गुन्ह्यांत ४१ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाली अाहे, तर बनावट क्रेडिट कार्ड तयार करून २८ फसवणुकीच्या घटना घडल्या असून त्यात ३२ लाख चार हजार रुपये हडप करण्यात अाले अाहेत. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांनी अाॅनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून एकूण ५७५ गुन्ह्यांत ७३ लाख ३९ हजार रुपये हडप केले अाहेत.

नाेटाबंदीनंतर पुण्यातील प्रशांत माटे यांना नुकताच एक निनावी फाेन अाला व संबंधित व्यक्तीने अापण बँक अधिकारी बाेलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून संबंधित बँक अधिकाऱ्याने त्यांचा १६ अाकडी कार्ड नंबर घेतला. त्यानंतर तत्काळ त्यांच्या खात्यावरून ४० हजार रुपये अनाेळखी खात्यात ट्रान्सफर झाले. अशाच प्रकारे विजय शिकाेत्रे यांना भामट्याने फाेन करून बँकेच्या मुख्यालयातून बाेलत असल्याचे सांगून तुमचे एटीएम ब्लाॅक झाल्याचे सांगत कार्डची माहिती घेत असतानाच परस्पर १८ हजार रुपये काढून घेण्यात अाले अाहेत, तर शनिवार पेठेत राहणाऱ्या मकसूद शहा यांना नवीन क्रेडिट कार्ड रिप्लेसमेंटसाठी माहिती विचारून त्यांच्या खात्यातून सात हजार रुपये चाेरण्यात अाले अाहेत.

भूलथापांना बळी पडू नका
सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील पवार म्हणाले, काेणतीही बँक त्यांच्या ग्राहकांकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची माहिती फाेनवर घेत नसते. अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्डवरील १६ अाकडी नंबर, सीव्हीसीचा तीन अाकडी नंबर, कार्ड मुदत संपण्याची तारीख याबाबत माहिती विचारणा केल्यास ती देऊ नका. अशा प्रकारे काेणाची फसवणूक झाल्यास तत्काळ पाेलिसांकडे तक्रार द्या व काेणत्याही भूलथापांना बळी पडू नका.
बातम्या आणखी आहेत...