आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ATS Give 25 Lakh Rupees For Confession, Nagori And Khandelwal Allegation

‘एटीएसचे 25 लाखांचे आमिष’; दाभोलकर हत्या प्रकरणात नागोरीचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी नागोरी - Divya Marathi
आरोपी नागोरी
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा कबूल करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांनी 25 लाखांचे आमिष दाखवल्याचा खळबळजनक आरोप या प्रकरणी अटक करण्यात आलेले मनीष रामविलास नागोरी (24) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (22) यांनी मंगळवारी न्यायालयासमोर केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यानुसार आम्हाला खोटे आरोपी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लाचलुचपतविरोधी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना 28 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.
एटीएसने ताब्यात घेऊन 45 दिवस आमची चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. बळजबरीने आमची नार्को व लाय डिटेक्टर चाचणीही घेण्यात आली. थर्ड डिग्री वापरून आमचा छळही झाला, असेही नागोरीने म्हटले आहे. चार महिन्यांपूर्वी पोलिसांना बॅलेस्टिक अहवाल मिळाला.
एक तुटलेले पिस्तूल आमच्याकडे दाखवून एटीएसने आम्हाला ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी दोन खोट्या गुन्हय़ात अटक करून दाभोलकरप्रकरणी आमची चौकशी केली. पुण्यातील आणखी किती संशयित गुन्हय़ात आम्हाला अटक करण्यात येणार आहे, असा सवालही त्याने केला.
आम्ही दोषी असू, तर आम्हाला 14 दिवसांची कोठडी देऊन सर्वांची नार्को चाचणी घ्यावी, अशी मागणीही नागोरीने केली. यावर न्यायाधीश शेख म्हणाले की, प्रकरणाचा तपास सुरू असून, तुम्ही दोषी आहात किंवा नाही हे पुराव्यांवर ठरेल. पोलिसांनी पुरावे जमवले असतील, तरच या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईल. अन्यथा नाही.
दरम्यान, नागोरी व खंडेलवाल यांना अडकवले जात असल्याचे सांगून बचाव पक्षाचे वकील बी.ए. अलूर म्हणाले की, 25 लाख देऊन एटीएसचा त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न आहे. दाभोलकरांची हत्या झाली त्याचदिवशी नागोरी व त्याच्या साथीदारांना मुंब्रा पोलिसांनी खंडणीच्या गुन्हय़ात अटक केली. घटनेनंतर दोनच दिवसांत बॅलेस्टिक अहवाल आला. मग दोघांना आताच का अटक होत आहे. प्रकरणाचा तपास सीबीआय, सीआयडीकडे जाऊ नये म्हणून पोलिस या दोघांना अटक दाखवून प्रकरण उलगडत असल्याचा बहाणा करत आहेत.
अहवालानुसारच अटक
नागोरी, खंडेलवालला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 7.65 एमएम कॅलिबरचे पिस्तूल आणि दाभोलकर हत्याकांडात वापरलेले पिस्तूल एकच असल्याचा बॅलेस्टिक अहवाल महिन्याभरापूर्वी पोलिसांना मिळाला. दोन्ही गुन्हय़ातील पिस्तूल एकच असल्याने ही अटक करण्यात आली आहे. गुन्हय़ाचा हेतू काय, इतर साथीदार कोण, गुन्हय़ातील मोटारसायकल, शस्त्र कोठून आणली याबाबत आरोपींकडे चौकशी करण्यात येणार आहे, असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले. सरकारी वकील माधव पोळ यांनी पोलीसांची बाजू मांडली.
नागोरीचे आरोप खोटे
एटीएस व पोलिसांवर नागोरी याने केलेले आरोप खोटे आहेत. बचावासाठी आरोपी असे आरोप करतच असतो. आम्ही आमच्या दृष्टीने तपास करत आहोत. खंडेलवालकडे सापडलेले पिस्तूल आणि दाभोलकर हत्याकांडातील हल्लेखोरांनी ज्यातून गोळय़ा झाडल्या ते पिस्तूल एकच असून, नागोरीनेच ते त्याला दिले आहे, असे पुण्याच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंके यांनी पत्रकारांना सांगितले.