आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attempting Connect Foreign Marathi Youths To Marathi Language

दूरदेशीच्या तरुणांना मराठीची साद, विदेशी मराठी तरुणांना भाषेशी जोडण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माय मराठीपासून दुरावलेल्या युवा पिढीच्या मनात ‘मराठी’चे प्रेम निर्माण करण्यासाठी आता राज्याच्या भाषा संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत जगभरातील सुमारे ६० देशांत राहणा-या मूळच्या मराठी मंडळींना पुन्हा मायमराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवापासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

राज्याच्या भाषा संचालक डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला ही माहिती दिली. ‘दूरदेशीही नांदे, माझी मराठी आनंदे’ अशी या उपक्रमाची टॅगलाईन असून, विदेशस्थ मराठी तरुणाईला पुन्हा मायमराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. जगभरातील अनेक देशांमध्ये मराठी मंडळी विखुरली आहेत. त्यांची युवा पिढी मराठी भाषेपासून दुरावली आहे. या पिढीला पुन्हा ‘मराठी’शी जोडण्यासाठी भाषा संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवाचा सण जगभरातील सर्व मराठी मंडळींमध्ये साजरा केला जातो. हे औचित्य लक्षात घेऊन ‘दूरदेशीही नांदे, माझी मराठी आनंदे’ या उपक्रमाचा प्रारंभ गणेशोत्सवापासूनच केला जाणार आहे. विदेशात राहणा-या मराठी कुटुंबियांसाठी, विशेषत: युवा पिढीसाठी विविध स्पर्धा व अन्य उपक्रम आखण्यात येणार आहेत. त्याला प्रतिसादही उत्तम मिळत आहे. सुमारे ५० मेल्स भाषा संचालनालयाकडे आल्या आहेत. हा उपक्रम स्पर्धात्मक असेल आणि प्रत्येकाला संचालनालयाकडून प्रमाणपत्रही देण्यात येईल,” असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

मेट्रो उद्घोषणांचे शुद्ध मराठीकरण करणार : रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानकांवर गाड्यांच्या आगमन व निर्गमन प्रसंगी करण्यात येणा-या उद्घोषणा अनेकदा सदोष असतात. अमराठी मंडळीही त्या ध्वनिमुद्रित करत असल्याने त्या नेमकेपणाने पोचत नाहीत. यासाठी आता भाषा संचालनालयाने या उद्घोषणा उत्तम, शुद्ध मराठी भाषेत अनुवादित केल्या आहेत. यापुढे सदर उद्घोषणा सुश्राव्य ठरतील, असे डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले.