आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादच्या गुंडाचे अपहरण; पुण्यात खून, सोने विक्रीच्या वादातून घटना, चार गुंडांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अाैरंगाबाद येथील सराईत गुंडाचे अपहरण करून त्याचा चिंचवडच्या चार गुंडांनी खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बापू केशव बनसाेडे (३२) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चिंचवड येथून सुनील ऊर्फ मुत्त्या लकडे, सुशील गायकवाड, अानंद दणाणे व मंगेश कदम या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, साेने विक्रीत फसवणूक केल्याने बनसाेडेचा अाराेपींनी गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी बनसाेडे हा इंडिगाे गाडीतून पुण्याकडे जात होता. या वेळी आरोपींनी रांजणगाव येथे त्याचे अपहरण केले हाेते. आरोपींनी बनसोडेचे अपहरण केल्यानंतर त्याला माेहननगर येथे एका खोलीत तीन दिवस डांबून ठेवले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह भिगवण-साेलापूर महामार्गालगत भीमा नदीपात्रात फेकून दिल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. मात्र, अद्याप बनसाेडेचा मृतदेह सापडला नाही. आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी त्याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी अाराेपींविराेधात रांजणगाव पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पिंपरी ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक हरीश माने यांनी दिली.

साेने जिवावर बेतले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू बनसाेडे याचा मंगेश कदम व त्याच्या साथीदारांसाेबत साेने विक्रीचा व्यवहार ठरला हाेता. त्यानुसार बापू हा २७ लाखांचे साेने १२ लाख रुपयांना आरोपींना देणार हाेता. मंगेश व त्याच्या साथीदारांनी बापूला आधीच १० लाख रुपये िदले हाेते. मात्र, पैसे मिळाल्यानंतर बापू साेने देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे अाराेपींनी पैसे वसूल करण्यासाठी त्याचे १५ जुलै राेजी अपहरण करून १८ जुलै राेजी गळा दाबून बनसोडेचा खून केला.