आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या कलाकारांना पुणेकरांची दाद; 'दिलरुबा मधुर हा' ने श्रोते मंत्रमुग्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- संगीत रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ कलाकार छोटा गंधर्व यांचे नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील कार्य सुपरिचित आहे, पण छोटा गंधर्व यांचे रागसंगीतातील कर्तृत्वही तेवढेच तोलामोलाचे होते, हे उलगडून दाखवणारा 'दिलरुबा मधुर हा' या शीर्षकाचा अनोखा कार्यक्रम औरंगाबादचे कलाकार दांपत्य विश्वनाथ आणि माधुरी ओक यांनी रविवारी सादर केला आणि पुणेकरांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

सुदर्शन संगीत सभेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ओक दांपत्याने छोटा गंधर्व यांचे रागसंगीतातील योगदान नेमकेपणाने मांडले. या दांपत्याला छोटा गंधर्व यांचे मार्गदर्शन दीर्घ काळ मिळाले आहे. त्याविषयी विश्वनाथ ओक म्हणाले, छोटा गंधर्व यांचा प्रत्यक्ष परिचय 1976 मध्ये पुण्यात झाला आणि आम्हा उभयतांना त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभले. सुमारे वीस वर्षे आम्ही पुण्याला येऊन आणि त्यांनी औरंगाबादेत येऊन आम्हाला शिकवले.

प्रचलित रागांप्रमाणेच अनवट रागांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. जोडराग ते अप्रतिम मांडत असत. रागसंगीताचे शास्त्र त्यांना पुरेपूर अवगत होते आणि नवनिर्मितीची ओढही विलक्षण होती. त्यामुळे छोटा गंधर्व यांनी अनेक नव्या रागांची निर्मिती केली. शेकडो सुंदर बंदिशी त्यांनी 'गुनरंग' या नावाने बांधल्या. अनेक दाक्षिणात्य राग त्यांनी हिंदुस्थानी संगीतात आणले.

छोटा गंधर्व यांनी मधुकर वृत्तीने संगीतातील सौंदर्यकण वेचले आणि ते अधिक सुंदर करून अभिव्यक्त केले. अनेक संगीत नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. ती नाट्यपदे रसिकांच्या मनात कायमची कोरली गेली. संगीत नाटकातील नायक म्हणून तर ते सर्वांनाच परिचित होते.

स्वरज्ञान, तालांवरील प्रभुत्व, लयकारीतील लडिवाळपणा आणि सादरीकरणातील लालित्य ही त्यांची वैशिष्ट्ये मैफलीच्या रूपाने मोठय़ा प्रमाणात रसिकांसमोर येऊ शकली नाहीत. ती मांडावीत, हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि पुणेकर रसिकांनी या प्रयत्नाला उत्स्फूर्त दाद दिली, असे विश्वनाथ ओक यांनी सांगितले.

नवरागनिर्मिती - नंदबसंत, मोहनी, भुवनेश्वरी, वागीश्वरी, बसंतीकोश (कंस), शंकराबहार, गुरुकल्याण, रामप्रिया आदी सुमारे 25 राग.
शेकडो बंदिशींची रचना - गुनरंग या नावाने रचना.
दाक्षिणात्य रागांचे सादरीकरण - वाचस्पती, रामप्रिया आदी.
जयपूर शैलीच्या तानांचे मार्गदर्शन उस्ताद भूजिर्खाँ यांच्याकडून.
तानांचा वेग वाढवून वेगळी शैली निर्माण केली.