आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८७ वर्षीय अाढावांनी साेडले सहाव्या दिवशी उपोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या प्रमुख मागण्यांसाठी ८७ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डॉ. आढाव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अाश्वासन दिल्यानंतर आढाव यांनी सहाव्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

राज्याचे पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या सहा दिवसांत आढाव यांची भेट घेऊन त्यांना उपाेषण मागे घेण्याची विनंती केली हाेती. त्यांच्या मागण्या शासनाला तत्त्वतः मान्य असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोपही त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात आला. मात्र, आढाव यांनी उपोषण मागे घेतले नव्हते. विविध राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी डॉ. आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता.

शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी डॉ. आढाव यांचे बोलणे करून दिले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर बापट यांनी मागण्या शासनाला तत्त्वतः मान्य असल्याचे पत्रही अाढाव यांना दिले. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून कृषी आयुक्त विकास देशमुख उपस्थित होते. त्यानंतर आढाव यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी आयुक्त देशमुख यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन त्यांनी उपोषण सोडले. पाटबंधारे विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे, गोरख मेंगडे, दत्तात्रय डोंबळे, संदीप धायगुडे यांनीही आढाव यांच्यासोबतच उपोषण मागे घेतले.

‘प्राण गेले तरी बेहत्तर...’
‘सरकार या प्रश्नी गंभीर आहे असे मानतो; पण मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर फिरवला तर आता जेवढे आयुष्य उरले आहे, तेवढे या चळवळीसाठी लढेन. तीन लाख शेतकरी आत्महत्या करतात तरी शासन हलत नाही. याविषयी घोषणा करण्याखेरीज उपाययोजना होत नाहीत ही शरमेची बाब आहे. अशा वेळी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्राण पणाला लागले तरी सार्थकता वाटेल. मात्र, शासनाने शब्द पाळला नाही तर पुन्हा बेमुदत उपोषणाला बसू. - डॉ. बाबा आढाव.
बातम्या आणखी आहेत...