आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवलेखक योजना राज्यात पोहोचलीच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील नवीन लेखकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना करिअर करण्यासाठी केवळ पोकळ प्रोत्साहन न देता प्रत्यक्ष मदत मिळावी आणि त्यांची सर्जनशीलता फुलावी, या हेतूने राज्य शासनाने जाहीर केलेली ‘नवलेखक योजना’ राज्यातच अद्याप फारशी पोहोचली नसल्याचे सिद्ध झाले आहे. सरत्या वर्षात म्हणजे सन २०१५ वर्षासाठी राज्यातून फक्त ५५ अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे दाखल झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

मराठी भाषेतील नवलेखकांना मराठी भाषेत ललित वाङ््मयाच्या लेखन - प्रकाशनासाठी प्रोत्साहन मिळावे, हे प्रोत्साहन आर्थिक साह्यासह असावे आणि त्यातून नवे लेखक उदयाला यावेत, या अपेक्षेने राज्य शासनाने २० वर्षांपूर्वी नवलेखक अनुदान योजना सुरू केली. ज्याचे एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, असाच नवलेखक या योजनेसाठी पात्र समजला जातो.

ही योजना राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळातर्फे कार्यान्वित केली जाते. योजनेतील सहभागासाठी मंडळातर्फे संकेतस्थळावरून नवलेखकांना आवाहन केले जाते. १ ते ३१ जानेवारी या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज नवलेखकांनी मंडळाकडे पाठवणे अपेक्षित असते. मात्र, ही योजना पुरेशा प्रमाणात नवलेखकांपर्यंत पोहोचलेलीच नाही, हे आकडेवारी सांगते आहे.

संख्यावाढीसाठी प्रयत्न
नवलेखक योजना अद्याप सर्वदूर पोहोचू शकली नाही, हे मान्य. मात्र, योजनेचा हेतू उत्तम असल्याने यापुढे अधिकाधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न मंडळ करेल. मंडळाने रास्त ठरवलेल्या निर्मिती खर्चाच्या ७५ टक्के अनुदान प्रकाशकाला देऊन मंडळ हे साहित्य प्रकाशित करते. गेल्या वर्षी २०१४ मध्ये या योजनेअंतर्गत ३५ अर्ज आले होते. त्या तुलनेत यंदा ५५ अर्ज आले आहेत. ही संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जातील. - बाबा भांड, अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ

नवलेखकांसाठी असे आहेत वाङ‌्मयप्रकार
- कवितासंग्रह : अंदाजे पृष्ठसंख्या कमाल : ९६
- कथासंग्रह : १४४
- नाटक किंवा एकांकिका : ९६
- कादंबरी : १४४
- बालवाङ््मय (काव्य, कथा, कादंबरी, नाटक) : ९६
- वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, ललित, प्रवासवर्णन) : १४४