आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात घरफोड्यास पुण्‍यात जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशभरात तब्बल पाचशेहून अधिक घरफोड्या करून अनेकांना गंडवणा-या देवेंद्रसिंग कृपानसिंग ऊर्फ बंटी (41) याला रविवारी पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले. देशातील विविध राज्यांतील पोलिस ठाण्यांमध्ये बंटीवर घरफोड्यांचे शेकडो गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यातील मंगळवार पेठेतील हॉटेल साई एक्झिक्युटिव्हमध्ये शनिवारी दाखल झालेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने हॉटेल मालकांनी जवळच्या समर्थ पोलिस ठाण्यात याविषयी माहिती दिली. त्याची खातरजमा करून पोलिसांनी त्वरित कारवाई केली. अपर पोलिस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, उपायुक्त रामनाथ पोफळे, सहायक पोलिस आयुक्त मकरंद रानडे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून बंटीला अटक केली. त्याच्याकडून तिरुअनंतपुरम येथून चोरलेले दोन मोबाइल तसेच एक लॅपटॉप जप्त करण्यात आला.
महाराष्‍ट्रा सह अनेक राज्यात बंटीने घरफोडी केल्या असून ठिकठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. एकट्या दिल्ली शहरात त्याने आजवर तीनशेहून अधिक घरफोड्या केल्या आहेत.

‘बिग बॉस’मध्ये सहभाग
बंटीने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता तसेच त्याच्या घरफोड्यांच्या करामतींवर आधारित ‘ओये लकी, लकी ओये’ या चित्रपटाचीही निर्मिती झाल्याची माहिती सांगितली जाते. अभय देओल याने चित्रपटात बंटीची भूमिका केली होती.

केरळमध्येही ‘कार’नामे
नुकतेच बंटीने केरळच्या तिरुअनंतपुरम येथील व्यावसायिक वेणुगोपाल यांचे घर फोडून सुमारे पन्नास लाखांचा माल लंपास केला होता. तसेच त्यांची 28 लाखांची स्पोर्ट्स कार घेऊन तो पसार झाला होता.
ही चोरलेली कार त्याने बंगळुरूमध्ये सोडली आणि तेथून भाड्याची गाडी करून तो पुण्यात आला होता. त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती दैठणकर यांनी दिली.