आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Auto Worker On Strike At Pune Chakan Plant

बजाज ऑटोच्या कामगारांचे \'कामबंद\' आंदोलन; उत्पादन ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील चाकण एमआयडीसीतील बजाज ऑटो लि.च्या कामगारांनी मंगळवारपासून (ता.25) 'कामबंद' आंदोलन पुकारले आहे. कामगारांच्या या संपामुळे मा‍त्र कारखान्यातील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे .कामगारांवर झालेली बडतर्फी, चौकशी, बदल्यांची कारवाई व्यवस्थापनाने मागे घ्यावी, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

कामगारांना कारणे दाखवा नोटीसा बजावणे, कामगारांवर आरोप लावणे, कामगारांना पाणी पिण्यासाठीच काय तर नैसर्गिक विधीसाठीही सोडले जात नाही. तसेच वरिष्ठांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवला जातो. तसेच विविध मार्गाने कामगारांची मानसिक पिळवणूक केली जाते. कामगारांच्या विरोधात पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. असा आरोप विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी केला आहे.

त्यामुळे व्यवस्थापनाच्या विरोधात कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयाकडे धाव घेतली आहे. तरीही व्यवस्थापनाकडून कामगारांना कारखान्याच्या आवारात धक्काबुक्की करणे, अपमानास्पद भाषा वापरणे, गुंडांकडून धमकावणे आदी प्रकार सुरु आहेत. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. व्यवस्थापनाच्या या छळवणुकीच्या विरोधात 'काम बंद' आंदोलन सुरु करण्यात आले आहे. व्यवस्थापन कामगारांवरील बडतर्फ, चौकशी, बदल्यांची कारवाई मागे घेणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कामगार संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

बजाज ऑटोच्या चाकण प्रकल्पात पल्सर आणि डिस्कव्हर या दुचाकींचे उत्पादन घेतले जाते. जवळपास 1200 कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत.