आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशीबाई-मस्तानीचा ‘पिंगा’ स्वप्नात शक्य, संजय लीला भन्साळीची खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "थोरल्या बाजीरावाची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांचा एकत्र पिंगा फक्त बाजीरावाच्या स्वप्नातच घालता येऊ शकतो,' अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची खिल्ली उडवली.
भन्साळी यांच्या आगामी "बाजीराव-मस्तानी' या चित्रपटात काशीबाई-मस्तानी यांचे एकत्रित नृत्य दाखवले आहे. हा प्रकार अनैतिहासिक असल्याच्या आरोपामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हे नृत्य वादग्रस्त ठरले आहे. "या पद्धतीने इतिहासाकडे पाहणे योग्य नाही. इतिहासाकडे चांगल्या पद्धतीनेच पाहायला हवे, असेही त्यांनी सांगितले,' असे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. भन्साळी जर माझा सल्ला घ्यायला आले असते तर मी त्यांना या चित्रपटात आणखी एक दृश्य घालायला सांगितले असते, असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, "थोरले बाजीराव झोपलेले दाखवायचे. काशीबाई आणि मस्तानी एकत्रित नृत्य करत असल्याचे स्वप्न त्याला झोपेत पडते, असा प्रसंग चित्रित करायचा. कारण हे दृश्य केवळ त्यांच्या स्वप्नातच घडणे शक्य आहे. कदाचित बाजीरावालाही दोघी एकत्र आल्याचे आवडले असते.'
‘काश्मीरची ५ हजार वर्षे’ या संजय नहार यांनी अनुवादित केलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. मोरे अध्यक्ष म्हणून बोलत होते. काश्मीर आणि महाराष्ट्राचे ऐतिहासिक संबंध असल्याचे त्यांनी या वेळी सोदाहरण स्पष्ट केले. "भारतातील पारंपरिक संगीताचा प्रमाणग्रंथ ‘संगीत रत्नाकर’ महाराष्ट्रात देवगिरीच्या परिसरात तयार झाला. देवगिरीकर यादवांच्या पदरी असलेल्या काश्मिरी पंडित शारंग देवाने तो लिहिला होता. त्याहीआधी आद्यकथाकार गुणाढ्य याने ‘पैशाची’ भाषेत ‘बृहतकथा’ लिहिल्या. ही भाषा काश्मीर परिसरातील होती. काश्मिरी पंडित वसुगुप्ताने शैवसूत्र पहिल्यांदा लिहिले. संत ज्ञानेश्वरांवर त्याचा प्रभाव होता, हे ज्ञानेश्वरीत आलेल्या त्याच्या उल्लेखामुळे स्पष्ट होते.'
फुलांचा गुच्छ
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आल्याची आठवण डॉ. मोरे यांनी काढली. "भारत हा फुलांचा गुच्छ आहे. यातल्या प्रत्येक फुलाचे अस्तित्व, रंग-गंध स्वतंत्र आहे. भारतीय संघराज्याचेही हेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक प्रांताकडे असे काही आहे की जे दुसऱ्या प्रांताकडे नाही. सर्व प्रांतांची ही वैशिष्ट्ये जपायला हवीत,' असे राव यांनी सांगितल्याचे डॉ. मोरे म्हणाले.
इतिहास की युद्धभूमी
‘चांगला इतिहास समजून घेतला तर इतिहासासारखा मित्र नाही. परंतु, इतिहासातल्या नको त्या गोष्टींकडेच पाहायचे ठरवले तर इतिहासासारखा शत्रू नाही,’ या ज्येष्ठ इतिहासकार शेजवलकर यांच्या वाक्याचा संदर्भ डॉ. मोरे यांनी दिला. गेल्या काही दिवसात इतिहासाशी छेडछाड हाेत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना ते म्हणाले, ‘अलीकडच्या काळात इतिहास ही आपल्याकडे युद्धभूमीच बनली आहे. ही प्रवृत्ती बरोबर नाही. इतिहासाकडे चांगल्या पद्धतीनेच पाहायला हवे.'