आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Disappointed Due To Droping Me Cartoon : Raj Thakare

मी व्यंगचित्रे सोडल्याची बाळासाहेबांना होती खंत-राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘बाळासाहेब ठाकरे, माझे वडील, आर. के. लक्ष्मण, डेव्हिड लो यांची चित्रे पाहूनच मी व्यंगचित्रांकडे वळलो. जे. जे. कॉलेजात असताना रोज दहा-दहा तास स्केचेस काढायचो. पुढे ते सगळे मागे पडले. बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्यासोबत असताना ‘तू व्यंगचित्रे काढायचं का सोडलंस?’ अशी खंत ते नेहमी व्यक्त करत,’ अशी आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर कार्यक्रमात सांगितली.

तिस-या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. शि. द. फडणीस, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, कैलास भिंगारे आदी उपस्थित होते.

वर्तमानपत्र काढायचंय...
राज म्हणाले, ‘खरे तर रोज सकाळी कल्पना सुचतात. बायको विचारते, ‘थरथरतोस का?’ मी म्हणतो, ‘थरथरत नाही. हात शिवशिवतोय.’ पण व्यंगचित्र काढणार कुठे? त्यामुळे सगळ्या गोष्टी थोबाडातून बाहेर पडतात आणि केसेस होतात. एका वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्र काढले तर दुस-याला राग येतो. व्यंगचित्रासाठी मला स्वत:चेच वर्तमानपत्र काढावे लागेल. पण एवढ्यात नाही,’ असा खुलासाही त्यांनी तातडीने केला. खूप वर्षांनी भांडणाशिवाय संमेलन पाहत असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, आर. के. लक्ष्मण हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाषण करू शकले नाहीत. मात्र ‘कॉमन मॅन’चे चित्र काढून त्यांनी भावना व्यक्त केल्या.

महिला व्यंगचित्रे का काढत नाहीत?
शि.द. फडणीस यांनी महिला व्यंगचित्रकार पुढे येत नसल्याची खंत व्यक्त केली. ‘खरे तर उपहास, टोमणे यांची जन्मजात देणगी असलेल्या स्त्रिया व्यंगचित्रे का काढत नाहीत हे आश्चर्यच आहे. अर्थात त्यांच्यावर काढलेली व्यंगचित्रे त्या उमदेपणाने स्वीकारतात.