आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बालशाहिरांनी जिंकली मने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक रोमांचक प्रसंगांचे पोवाडे खड्या आणि दमदार स्वरात सादर करून बालशाहिरांनी शनिवारी रसिकांची मने जिंकून घेतली. ही किमया केली पिंपरी येथील कमला नेहरू शाळेतील 15 बालशाहिरांनी. त्यांच्या या कामगिरीला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली.


निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पांढराशुभ्र पोषाख, कमरेला भगवा शेला, शेल्यातील म्यानात खोचलेल्या तलवारी, डोक्यावर कणीदार पगडी आणि हातात डफ अशा मावळी थाटात बालशाहिरांनी शिवरायांच्या आयुष्यातील अनेक रोमांचक प्रसंग बाल आवाजातून जिवंत केले. महाराजांनी बालवयात सवंगड्यांसह घेतलेली स्वराज्याची शपथ, तोरण्याची चढाई, अफजलखानाचा वध, सिद्दी जोहरची फजिती, बाजीप्रभूंचे बलिदान, शाहिस्तेखानाचा पराभव, पुरंदरचा तह आणि शिवराज्याभिषेक असे अनेक प्रसंग बालशाहिरांनी आवेशाने सादर केले.