आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूचा तरुण बनला सुपर डॅड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशात 40 टक्के बालके असून त्यांच्या मूलभूत हक्कांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. पती - पत्नींमधील वाढत्या घटस्फोटांमुळे मुलांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी व बालकांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी बंगळुरूचा एक तरुण सुपर डॅड बनला आहे. मनप्रीतसिंग भंडारी असे या तरुणाचे नाव असून तो सुपरमॅनचा ड्रेस घालून देशातील विविध शहरांत तीन वर्षे हे अभियान राबवणार आहे.
मनप्रीतसिंग हा मूळ दिल्लीतील रहिवासी आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरीमुळे तो बंगळुरू येथे स्थायिक झाला आहे. नोकरी करताना त्याचा विवाह झाला. त्यांना एक मुलगीही झाली. मात्र, पत्नीशी वाद झाल्याने त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतरच्या काळात न्यायालयीन प्रक्रियेत महिलांच्या बाजूने असलेले कायदे व मुलीचे होणारे हाल पाहून त्याने याबाबत ठोस भूमिका घेण्याचे ठरवले. बालकांबाबत असलेल्या कायद्याचा त्याने अभ्यास करून बंगळुरू येथे क्रिस्प ही संस्था स्थापन केली.
मनप्रीतने आता पुढील तीन वर्षे देशभर बालकांच्या हक्कासाठी जागृती अभियान आखले असून त्यासाठी त्याने कुटुंब व नोकरीचाही त्याग केला आहे. विविध शहरांतील शाळा, मॉल, सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी तो सुपर डॅडचा ड्रेस घालून जागृती करत आहे. फेब्रुवारी 2014 पर्यंत नागपूर, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम व पुद्दुचेरी येथे तो अभियान राबवणार असून त्यानंतर देशात फिरणार आहे.
घटस्फोटांचे दुष्परिणाम
नॅशनल क्राइम रेकॉडनुसार गेल्या वर्षी 1 लाख 10 हजार विवाहित स्त्री-पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. पती-पत्नीतील आर्थिक वाद, कामाचा ताण, अफेअर यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. पित्याच्या प्रेमास मुकल्याने पाच टक्के मुले आत्महत्या करतात, 9 टक्के मुले शाळा सोडून देतात, 14 टक्के मुले लैंगिक विकृतीच्या मार्गास, 20 टक्के मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, तर 32 टक्के मुले घरातून पळून जातात.