आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडवलदारांच्या थकीत कर्जामुळे बँका अडचणीत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार. - Divya Marathi
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार.
पुणे- “भांडवलदारांची बँकांमधली थकबाकी हा देशापुढील मोठा प्रश्न आहे. त्यांच्या कर्जामुळे  बँका अडचणीत आल्या असून या कर्ज वसुलीचे आव्हान सरकारसमोर अाहे,’अशी कबुली देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी पुण्यात दिली. मात्र श्रीमंतांकडील कर्जवसुलीसाठी सरकार कठोर पावले उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्यात जेटली बोलत होते. या वेळी माजी कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. या वेळी पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जेटलींच्या हस्ते पवारांचा सत्कार करण्यात आला.   पुणे जिल्हा बँकेचे कौतुक करून जेटली म्हणाले, ‘बँका व खातेदारांचे नाते विश्वासाचे असले पाहिजे. बँकेने विश्वासार्हता गमावली, तर शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. छोटे शेतकरी हे प्रामाणिकपणे कर्ज फेडतात. तर मोठे भांडवलदार कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून देखील सक्तीने वसुलीचे धोरण अवलंबले आहे’, असे जेटलींनी सांगितले.  

शरद पवार म्हणाले, ‘पुणे जिल्हा बँकेची आजवरची वाटचाल चांगली आहे, परंतु सद्य:स्थिती पाहता संकटातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य व केंद्राने उभे राहावे. नोटाबंदीचा सर्वांत जास्त फटका ग्रामीण भागाला बसला. त्यामुळे जिल्हा बँकेतील दहा टक्के रक्कम तातडीने जमा करून घेऊन 

नुकसान टाळावे.’   
‘सहकार क्षेत्रात सर्वच वाईट आहेत, असे नाही. जे चांगले काम करतात, त्यांना चांगले म्हटलेच पाहिजे. सरसकट सहकारी बँकांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवू नका,’’ असे सांगत अजित पवारांनी सहकार क्षेत्राबाबत राज्य सरकारने दृष्टिकोन बदलावा, अशी सूचना केली. त्यावर “जे चांगले आहेत, त्यांच्या पाठीशी सरकार आहे. मात्र ज्या ठिकाणी गैरकारभार आणि भ्रष्टाचार आहे, तेथे कडक कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...