आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटण्याचाच धंदा वाढल्याने शरद पवारांची साथ सोडली - चंदरराव तावरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारा वर्षांपासून सत्ता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील वर्चस्वाला यंदा सुरुंग लागला. पवारांचे एकेकाळचे निष्ठावंत चंदरराव तावरे यांनीच हा धक्का दिला. राज्यात व केंद्रात सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर पवारांचा बारामतीतीलच हा पराभव धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय मानला जाताे. या पार्श्वभूमीवर प्रदीप गुरव यांनी तावरेंशी केलेली ही बातचीत....

प्रश्न : शरद पवारांचे तुम्ही एकेकाळचे खंदे समर्थक. तुमची राजकीय वाटचाल कशी सुरू झाली?
तावरे : माझा जन्म सधन शेतकरी कुटुंबातला. शरद पवार व मी मॅट्रिकला एका वर्गात होतो. मात्र, नंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात गेले व मी पुढील शिक्षण न घेता शेतीतच रमलो.वयाच्या २१ व्या वर्षी सांगवी गावचे सरपंचपद मिळाले. नंतर पंचायत समितीचा सदस्य झालो. तो काळ राजकारणातून समाजसेवेचा होता. त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून माझी निवड झाली. सलग ३५ वर्षे या कारखान्यावर संचालक, चेअरमन, व्हाइस चेअरमन अशी पदे मी भूषवली. त्यात काही काळ कारखान्यावर पवारांचे वर्चस्व हाेते. त्या वेळी दीर्घकाळ त्यांच्यासाेबतही काम करण्याची संधी मिळाली.

प्रश्न : मग अजित पवारांविरोधात निवडणूक का लढवली?
तावरे - ते माझ्याशी थोडंसं चुकीचं वागले. १९९२ मध्ये माझ्या नेतृत्वाखाली कारखान्याचे पॅनल उभे केले व निवडूनही आणले. त्या वेळी मला पुन्हा चेअरमन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी मला पद नाकारले. अपमान झाल्यामुळे मी चिडलो. अजित पवारांना आव्हान देण्यासाठीच तेव्हा निवडणूक लढवली. पुन्हा १९९७ मध्ये कारखान्यावर आमचे पॅनल निवडून आणले व तेव्हापासून पवार विरोध सुरू झाला.

प्रश्न : शरद पवारांशी तुमचे राजकीय मतभेद आहेत का?
तावरे - असं म्हणता येणार नाही... वैचारिक मतभेद आहेत... थोरल्या पवार साहेबांनी अजित पवारांना धाकात ठेवायला हवे. पवार अन् मी समवयस्क, मित्र. शिक्षण पूर्ण करून पवार साहेब बारामतीत सक्रिय झाल्यानंतर माझ्याच दुचाकीवर बसून फिरत. मीच त्यांच्या कार्यकर्त्यांशी ओळखी करून दिल्या होत्या. मात्र, अजितने माझ्या वयाचा मान ठेवला नाही.

प्रश्न : माळेगाव सहकारी कारखान्याचे खासगीकरण होईल अशी भीती आहे?
तावरे- इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्याचा २ हजार टन ऊस खासगी कारखान्याला जातो. त्यात वाढ होईल. म्हणून सहकार जिवंत ठेवण्याचे काम शासनाचे आहे. मी माळेगाव कारखान्यातून बाहेर पडलो तेव्हा या कारखान्यावर फक्त शेतकर्‍यांना दिलेल्या उचलीचे कर्ज होते. कारखाना तोट्यात नव्हता. सरकारी भागभांडवल परत करणारा एकमेव कारखाना होता. मात्र, नंतर ‘यांनी’ (पवारांच्या गटाने) कर्जाचा डोंगर उभा करून खासगीकरण करायचा घाट घातला होता. पवारांचा फक्त लुटण्याचाच धंदा आहे म्हणूनच मी त्यांची साथ सोडली.

प्रश्न : पवारांनी खासगीकरणाला विरोध केला होता. मात्र, आता त्यांचेच समर्थक खासगी कारखाने काढत आहेत..
तावरे - राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्यांना काही देत नाहीत. या पक्षाचा एक तरी जिवंत कार्यकर्ता दाखवा. गावातून आेवाळून टाकलेली माणसे या पक्षात आहेत. त्यांना शिस्त नाही.

सहकार मोडून खासगीकरणाचाच घाट
प्रश्न : पवारांनी खासगीकरणाचा घाट घातला, असे कशावरून म्हणता?
तावरे : वसंतदादा पाटील आमचे व्याही व महाराष्ट्राचे जुने जाणते नेते.. मूलभूत सुविधांबरोबर तालुक्याचा विकास होत होता तोपर्यंत पवारांसोबत होतो. मात्र, नंतर पवारांची एकाधिकारशाही वाढली. कारखान्याचे चेअरमन तेच नेमतात, तेच काढून टाकतात. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथील सहकारी साखर कारखाना जवळपास ६०० कोटींचा आहे. तो पवारांच्या जवळच्या माणसाने फक्त २७ कोटींमध्ये विकत घेतला आहे. पवार व त्यांच्या जवळच्या मंडळींनी सहकार मोडून खासगीकरणाचा घाट घातला आहे. त्याला आमचा विरोध आहे.