आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारामती: निरा नदीवरील बंधारा जिलेटिन स्फोटाने पाडला, वाळूमाफियांवर संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वाळू उपसा करतानाचे संग्रहित छायाचित्र)
बारामती- बारामती जवळील कांबळेश्वर गावात असलेल्या निरा नदीवरील बंधारा सोमवारी रात्री अज्ञातांनी जिलेटिनच्या स्फोटांनी पाडून टाकल्याची घटना पुढे आली आहे. घटनास्थळी जिलेटिनशी संबंधित साहित्य आढळून आले आहे. तसेच त्यासाठी 300 मीटर अंतरापर्यंत वायर अंथरल्याचे दिसून आले आहे. या स्फोटात निरा नदीच्या बंधा-याची एक मोरी संपूर्णपणे वाहून गेल्याने बंधा-यात साठा केलेले 70-80 टक्के पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याबाबत स्थानिक शेतक-यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, हा प्रकार निरा नदीच्या बंधा-याच्या पाणीखाली असलेली वाळू उपसण्यासाठी हे कृत्य केल्याचा संशय शेतक-यांनी व्यक्त केला आहे. लोणी काळभोर व उरळी कांचन भागातील एका गुंडाने वाळू उपसण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असावा अशी चर्चा बारामती परिसरात सुरु झाली आहे.
बारामती शहराच्या दक्षिण दिशेला निरा नदी वाहते. या नदीतिरावर बारामती तालुक्यातील कांबळेश्वर, लाटे, होळ, मुरूम आदी गावे आहेत. या निरा नदीवर एक मोठा बंधारा बांधला आहे. या बंधा-यात पाणीसाठी केला जातो. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांना या पाणीसाठ्याचा उन्हाळ्यात पिके घेण्यासाठी फायदा होतो. यंदा निरा नदी परिसरात भरपूर व उशीरापर्यंत पाऊस पडल्याने कांबळेश्वर येथील बंधारा गच्च भरून ठेवला होता. त्यामुळे शेतक-यांना पुढील तीन महिने काढता येणार होते. मात्र, निरावागज, सांगवी, खांडज, कांबळेश्वर, मेखळी, शिरवली, कांबळेश्वर, लाटे, होळ, मुरूम या गावाच्या हद्दीतील नदीपात्रात काही किलोमीटरपर्यंत वाळू आहे जेथे पाणी आहे. त्यामुळे या परिसरातील वाळूचा ठेका घेतलेल्यांना वाळू उफसता येत नाहीये.
या नदीवरील वाळूचा ठेका उरळी कांचन व लोणी काळभोर परिसरात गुंडगिरीने दहशत माजवणा-या एका गुंडाने घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानेच हे कृत्य केले असावे अशी कांबळेश्वर-लाटे परिसरातील शेतक-यांना संशय आहे. अशा लोकांना राजकीय पाठबळ आहे की काय अशी भीतीही त्यांना आहे. त्यामुळे आज दिवसभर निरा नदीच्या बंधारा पाडल्याची चर्चा बारामती परिसरात सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...