आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीत बंदची प्रथा झाली बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - फेसबुक, सोशल मीडियात झालेल्या महापुरुषांच्या बदनामीचे पडसाद अनेक शहरांत उमटले. विविध ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवून त्याचा निषेध करण्यात आला. दुर्दैवाने अशा घटना घडल्यास बारामती शहर आता यापुढे बंद राहणार नाही. उलट त्या दिवशी राज्यघटनेच्या प्रतीची दिंडी काढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरात रविवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेऊन अनोखा पायंडा पाडण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील बारामती हे शहर इतके दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राजकारणासाठी व त्यांनी केलेल्या विकासकामांसाठी प्रसिद्ध होते. परंतु ताणतणावाच्या घटनेनंतरही शांत राहणारे शहर म्हणून त्याची ओळख निर्माण होणार आहे. शरद पवारांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. सोशल मीडियात महापुरुषांचा अपमान करणारी छायाचित्रे, मजकूर प्रसिद्ध झाल्याचे हिंसक पडसाद राज्यात विविध ठिकाणी उमटले. या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी रविवारी शांतता समितीची एक बैठक आयोजित केली होती. त्यात सामाजिक कार्यकर्ते यशपाल भोसले यांनी शहरातील व्यवहार बंद न ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे बैठकीतील सर्व सदस्यांनी त्याला एकमुखाने पाठिंबा दिला. घटनेनंतर आंदोलन व जाळपोळीच्या घटनांमुळे सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. असे नुकसान टाळण्यासाठी अशा बंदवरच बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात लवकरच राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोहल्ला समित्या गठित केल्या जातील व शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल.

सोलापूर आठवड्यात चार वेळा बंद
महापुरुषांच्या अपमानाच्या घटनेचे पडसाद उमटल्याने सोलापूर शहरात गेल्या आठवड्यात चार वेळा बंद पाळण्यात आला. या बंदमुळे जवळपास 12 कोटींचे व्यावसायिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बारामतीकरांचा निर्णय वेगळेपण दर्शवणारा आहे.