आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमित्त गरिबांना मिळणार मदतीची ‘ऊब’, बारामतीत जमविले ट्रकभर कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- देशभर दिवाळीनिमित्त नवनव्या वस्तूंच्या खरेदीची लगबग सुरू असताना अाजही काही लाेक अापल्या कुटुंबीयांच्या किमान गरजाही पूर्ण करू शकत नाहीत. या गरजू, गरीब लाेकांच्याही चेहऱ्यावर दिवाळीनिमित्त अानंद झळकावा यासाठी बारामतीतील काही खेळाडू तरुण मंडळींनी पुढाकार घेतला अाहे. शहरातील मुख्य चौकात उभा राहून काही तरुण कबड्डीपटू येणाऱ्या जाणाऱ्यांना जुने कपडे, ब्लॅकेट्स, स्वेटर्स, जुने दप्तर, खेळणी, पुस्तके, वह्या, घरातील अडगळीला पडलेल्या वस्तू दान करण्याचे अावाहन करतात. त्यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत सामान्य नागरिकही पिशव्या भरभरून कपडे, वस्तू आणून देत असल्याचे चित्र रविवारी दिसून अाले. या वस्तू गरीब, वंचितांना पुरवण्यात येणार अाहेत.
बारामती शहरातील अजिंक्य सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, प्रसिद्ध कबड्डीपटू दादासाहेब आव्हाड, त्यांचा करण वाघोलीकर अादी तरुणांनी यंदा ‘सार्थक दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घेतला अाहे. शहरवासीयांच्या मदतीने गरीब लाेकांना अावश्यक त्या वस्तू पुरविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला अाहे. त्यासाठी रविवारी ही मंडळी रस्त्यावर उतरली हाेती. सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरु हाेता. शहरातील असंख्य नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत जुने कपडे, वस्तू, शालेय साहित्य या कार्यकर्त्यांकडे जमा केले. दिवसअखेर जवळजवळ ट्रकभर सामान जमा झाले हाेते. गरीबांसाठी देशपातळीवर काम करणाऱ्या ‘गुंज’ या सेवाभावी संस्थेला हे साहित्य पाठविण्यात अाले अाहे. त्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत ते पुरविण्यात येणार अाहे.
गुंज या सामाजिक संस्थेच्या मुंबई केंद्राकडे संकलित झालेले ट्रकभर सामान पाठविण्यात अाले अाहे. या सर्व वस्तू कपड्यांची डागडुजी, स्वच्छता करून ते आदिवासी, पूरग्रस्त, झोपडपट्टी, दुष्काळग्रस्त, हातावरचे पोट असणाऱ्या गरजू गरीब लोकांना आवश्यकतेप्रमाणे वाटण्यात येणार आहेत. त्यामुळे गरिबांच्या घरची दिवाळी अानंदाने साजरी हाेणार अाहे.

गरजूंना आनंद देण्यात खरी दिवाळी
देशात अजूनमोठ्या प्रमाणात गरिबी आहे. आदिवासी लाेक तर खूप हलाखीचे जीवन जगत आहेत. कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. दिवाळीत सर्वजण नवीन कपडे खरेदी करतात. जुने कपडे अडगळीला पडतात. याचा वापर गरजू वंचितांना व्हावा ही इच्छा मनात आली अन् सहकारी मित्रांच्या साहाय्याने जुने कपडे, वस्तू संकलित केल्या. गरजूंना आनंद देण्यात खरी दिवाळी होते.
-दादासाहेब आव्हाड, कबड्डीपटू
बातम्या आणखी आहेत...