पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्या अस्सल गावरान वक्तृत्त्वाने रविवारी पुणेकरांना जिंकले. दानवे यांनी खास मराठवाडी शैलीत सांगितलेल्या किश्श्यांनी खचाखच भरलेले बालगंधर्व रंगमंदिर हशा आणि टाळ्यांनी दणाणले. त्यांच्या भाषणाला ‘वन्स मोअर' मिळाला. ‘केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच तंग झालाे,’ अशी कबूलीही यावेळी दानवेंनी दिली. निमित्त होते ते सांसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे.
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते बापट यांना गौरविण्यात आले. दानवे अध्यक्षस्थानी होते. सत्कार बापटांचा असला तरी या कार्यक्रम गाजवला दानवे यांनी. ‘आयुष्यात २३ निवडणुका लढवल्या. त्यातल्या २२ जिंकल्या. इतक्या निवडणुका जिंकणारा माणूस भाजपमध्ये दुर्बिण घेऊन शोधावा लागतो,’ या त्यांच्या टिप्पणीवर जोरदार हशा पिकला. साठ हजार रुपये खर्चून मी आमदार झालो होतो. आता खर्च विचारायची सोय राहिली नाही. भाजपचा माणूस निवडून येऊ शकतो यावरच कोणीही विश्वास ठेवत नव्हते, असे सांगून दानवे यांनी त्यांच्या पंचायत समितीच्या सभापतीपदाचा किस्सा रंगवून सांगितला.
‘आमच्या पक्षात कोणाच्याही हातात काही नसते. पक्ष जो आदेश देईल तो पाळावा लागतो. मात्र संघटनेत काम करण्याची आवड असल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद खुशीने स्वीकारले.
नरेंद्र मोदी आणि
अमित शहा यांनी ब-याच दिवसांपूर्वी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. पण मी कोणाला सांगितले नव्हते, असेही दानवे म्हणाले. तर ‘आजकालच्या राजकारणात व्यक्तीद्वेष, राजकीय अस्पृष्यता वाढताना दिसते. ती टाळून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल,’ असे बापट सांगितले.कॉंग्रेसचे उल्हास पवार, शिवसेनेचे दिवाकर रावते, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, मनसेचे बाळा नांदगावकर अादी उपस्थित होते.
केंद्रातले मंत्री निर्णय घेताना पाणी पितात...
मी आणि बापट जनसंघाचे संस्थापक सदस्य. आम्ही खूप कष्ट केले. लोक हसायचे. फार बेकार दिवस गेले. आता कुठे मंत्रीपद मिळाले. पण केंद्रात मंत्री झालो त्या पहिल्या दिवशीपासून तंग झालो, अशी कबुली दानवे यांनी दिली. ‘नरेंद्रभाईंच्या नेतृत्वात काम करणे सोपे नाही. केंद्रातले मंत्री निर्णय घेताना दहा- बारावेळा पाणी पितात. निर्णय घेणे सोपे नाही. जबाबदारीने ते पूर्णत्वासही न्यावे लागतात,’ हे सांगतानाच मोदींनी देशात बदल घडवून आणल्याचे सांगण्यासही दानवे विसरले नाहीत.
‘अगली बारी नही पगले, अबकी बारी’
‘प्रमोद महाजन यांच्या सूचनेवरुन वाजपेयी यांना आणण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. ‘अगली बारी अटलबिहारी’ अशा घोषणा आम्ही देत होते. अटलजींची गाडी आली. त्यांचे स्वागत करुन पुन्हा आम्ही घोषणा देऊ लागलो. तेव्हा अटलजींनी मला कानात सांगितले, ‘अगली बारी नही पगले’, कहो ‘अब की बारी..’. तरी त्यावेळी आमचे दोनच खासदार निवडून आले. तिथून सुरवात करुन येथपर्यंत पोचल्याचा खूप आनंद होतो, ” या दानवेंच्या आठवणीवर टाळ्या पडल्या.