आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhalchandra Nemade Critics On Literature Festival

संमेलन भरवणारे टोळभैरव, भालचंद्र नेमाडे यांची सडकून टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कुठल्याशा बेटावर चार मराठी माणसे आहेत, असे समजले तर ही मंडळी तिथेही जाऊन संमेलन घेतील. हे लोक टोळभैरव असतात. उत्सव करण्यासाठी शत्रूचा पैसा घेऊनही हे काम चालवतील. अशांचे संमेलन म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी संमेलन भरवण्यांवर तोफ डागली.
कुठलाही मुलाहिजा न ठेवता नेमाडे आज संमेलन भरवणाऱ्यांवर तुटून पडले. संमेलनाविषयीची माझी मते न पटणारी आहेत, हे सुरवातीलाच स्पष्ट करून ते म्हणाले, वॉल्टेअर नावाच्या प्रसिद्ध विचारवंताचे वचन आहे. शहाणपणाला मर्यादा असतात आणि मूर्खपणाला हद्द नसते, या संमेलनाबाबतही असेच म्हणता येईल.
संमेलनात कष्टकरी किती सहभागी होतात, संमेलनातून मराठी संस्कृती दिसते का, असा सवाल करत नेमाडे म्हणाले, उत्सव साजरे करण्यासाठी हे लोक शत्रूचाही पैसा घेतील. हे सारे अनाठायी आहे, वेळेचा अपव्यय करणारे आहे. संमेलनातून साहित्य किती पुढे जाते, हा प्रश्न आहे. पण यांना चुकून काही लोक सापडतात आणि जे सापडतात, ते नंतर पस्तावतात.
नेमाडे उवाच- भाषा सल्लागार समितीची मराठी भाषा सक्तीची करावी ही शिफारस योग्य आहे. मराठी ही जगातली 15 वी मोठी भाषा आहे. त्यामुळे भाषेची काळजी करण्याचे कारण नाही. जे असे बोलतात त्यांची मात्र काळजी केली पाहिजे. त्यांच्यापासून काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात पण ती मराठीसाठी काय करतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद केल्या पाहिजेत. शेजारच्या कर्नाटकात असे चालत नाही. इंग्रजी यावी जरूर, पण त्यासाठी आपल्या भाषेचा बळी नको.
मातृभाषा आलीच पाहिजे- मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यास प्रश्न सुटतील का असा सवाल करून नेमाडे म्हणाले, आधी आपल्या घरात मराठी नीट केली पाहिजे. दर्जामुळे पैसे मिळतील. पण प्रश्न सुटणार नाही. आपल्याला स्वप्ने देखील मराठी भाषेत पडली पाहिजेत. इंग्रजी आधी शेजारची चिनी भाषा आली पाहिजे.