आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Bhalchandra Nemade In Divya Marathi

मुलाखत: ‘पांडुरंग सांगवीकरा’ने विनोद म्हणूनच पाहावे, राजकारणाबाबत नेमाडेंचे परखड मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “राजकीय पुढारी आणि त्यांच्या पक्षाकडे ‘पांडुरंग सांगवीकरा’ने विनोद म्हणूनच पाहावे. त्यांच्या विचारधारा आणि प्रचार हे सगळं विनोद म्हणून पाहण्यासारखचं असतं. खरं काम लोक आपापल्या परीने खेडोपाडी जाऊन करत असतात आणि त्यातूनच समाज वाढत जातो. राजकीय लोकांमुळे काही होत नाही,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले.

“मी नेहमी मतदान करतो. याहीवेळी करणार; परंतु निवडणुकांकडे ‘रिच्युअल’ इतक्या मर्यादित अर्थानेच पाहावे. त्याच्यातून फार काही पुढे जाता येणार नसल्याने त्यावर अजिबात लक्ष देऊ नये. ज्या पक्षाच्या उमेदवाराची नैतिकता माहिती असेल त्याला मत देऊन परत यावे. राजकीय विचारधारा, पक्ष असल्या भानगडीत पडू नये,” असे मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर तीनच वर्षांनी १९६३ मध्ये भालचंद्र नेमाडेंची ‘कोसला’ ही कादंबरी मराठी वाचकांपुढे आली. स्वातंत्र्याकडून ठेवलेल्या अपेक्षांचा भंग झालेल्या तरुणाईचे भावविश्व ‘पांडुरंग सांगवीकर’ या ‘कोसला’च्या नायकाने उलगडले. तत्कालीन तरुणांची अस्वस्थता आणि वैफल्याचे प्रतीक म्हणजे ‘पांडुरंग सांगवीकर.’ कोसला प्रसिद्ध होऊन ५१ वर्षे उलटली आहेत. ‘कोसला’तले अस्वस्थ ‘पांडुरंग सांगवीकर’ मात्र लाखोंच्या संख्येने आजही महाराष्ट्रात आहेत. आजच्या अस्वस्थ तरुणाईने निवडणुकीला किती महत्त्व द्यावे, याबद्दल ‘पांडुरंग सांगवीकरा’चे जन्मदाते डॉ. नेमाडे ‘दिव्य मराठी’शी संवाद साधत होते.

डॉ. नेमाडे म्हणतात, की आवडेल तो चांगला माणूस निवडून देणे हा ‘निवडणुकी’चा अर्थ. पण पाहायला काय मिळते तर गोंधळ, आरडाओरड, प्रदूषण, भ्रष्टाचार, पैशांचा वारेमाप वापर. हे सगळं निवडणुकीच्या संकल्पनेच्या विरुद्ध जाणारे आहे. या सगळ्यातून खरी ‘निवडणूक’ शक्यच नसते. आपण त्याला निवडणूक म्हणत असलो तरी ती निवडणूक नसते. शिवाय सरकार या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्नही उरतोच. “सरकार म्हणून जे काही झालं ते आपण चुकून कोणीतरी चांगला माणूस निवडून दिला त्याच्याकडून, वैयक्तिक पातळीवर झालं आहे. एरवी आपण मतदान केलं आणि तेच झालं असं नाही. पार्लमेंटच्या पातळीवर किंवा कायद्यामुळं काही होत नाही. कायद्यांमुळे समाज सुधारत नसतो. गुन्हे, बलात्कार, भ्रष्टाचार कमी होत नाहीत. कायद्याची भीती सज्जनांनाच असते,” असे डॉ. नेमाडे म्हणतात. त्यांनी सांगितले, “गेल्या साठ वर्षांत चांगलं खूप घडलं. पण ते सरकारमुळं घडलेलं नाही. मी तर या मताचा आहे, की चांगल्या गोष्टी करायला सरकार असमर्थच आहे. मुळात जे लोक चांगले असतात ते आपापल्या परीने चांगलं काम करत राहतात. ही मंडळी कधी सरकारात असतात कधी बाहेर. अभय बंग, प्रकाश आमटे, मेधा पाटकर यांनी चांगलं काम केलंय की नाही? ही सरकारातली लोक नाहीयेत. यशवंतराव चव्हाण सरकारात होते. त्यांनी खूप चांगलं काम केलं. महत्त्व सरकारला नाही तर चांगल्या माणसांना आहे.”
सीमा तुटल्या पाहिजेत
“जात, धर्म, भाषा, प्रांत या सीमा तुटायला हव्यात. या सीमा तोडण्याचं काम भाषेतून होतं. भाषेचा परिणाम नेणीवापर्यंत होतो. जाणिवा उन्नत करण्याचं काम भाषेचं. भाषेचा प्रसार वाढला, चांगलं साहित्य वाचलं की या सीमा तोडून माणसं विचार करायला लागतील. म्हणून वाचनसंस्कृती महत्त्वाची. पण असं होत नाही,” डॉ. भालचंद्र नेमाडे

सरकार हे करेल का?
“येणा-या नव्या सरकारने बारावीपर्यंत मराठी अनिवार्य केले पाहिजे. युनोलाही असेच वाटते. सगळ्या भाषातज्ज्ञांचेही हेच मत आहे, असे डॉ. नेमाडे स्पष्टपणे सांगतात. सरकारने प्राधान्यक्रम ठरवून घ्यावेत. शेतीला, पिण्यासाठी पाणी या मूलभूत गोष्टींबाबत काही तरी करून दाखवावे. इंग्रजी शाळांचे प्रस्थ कमी करा, शाळांमधून मुता-या तरी बांधा, एवढे तरी करता येईल ना, असे ते विचारतात.

महापुरुषांच्या नावाने मूर्ख बनवले
“कधी फुलेंचं नाव घ्यायचं. कोणी आंबेडकरांच नाव घेतो. कोणी शिवाजीला वापरतो. या सगळ्या वापरून घेण्याच्या सोंगट्या झाल्या आहेत. यांना कोणाला काही प्रेम नसतं यांच्याबद्दल. शिवाजी महाराजांचं आणि त्यांचं नाव घेणा-याचं काहीच जुळत नाही. एकही गोष्ट त्यांच्यात समान नसते. पण लोक मूर्ख आहेत. उलट असं कोणी म्हणतं त्याला बिलकूल मत द्यायचे नाही, अशी जाणीव झाली पाहिजे. ती दुर्दैवाने होत नाही. याने शिवाजीचं नाव घेतलं म्हणजे हा आपला असावा, त्यानं आंबेडकरांचं नाव घेतलं मग त्याला मत द्यावं, या जाणिवा सुटल्या पाहिजेत,” असा आग्रह डॉ. भालचंद्र नेमाडे धरतात.