आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhima River Water Flowing Very Slowly Towards Ujani Dam

खड्ड्यांमुळे उजनीच्या पाण्याचा प्रवास संथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उजनी धरणात पाणी सोडण्यासाठी भामा आसखेड व आंद्र धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवास भीमा नदीच्या पात्रात वाळू उपसण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे संथ गतीने सुरू झाला आहे. अनेक अडथळे पार करून पुणे जिल्हातील दौंड जवळ शनिवारी सकाळी हे पाणी पोहोचले. सोलापूर जिल्ह्याची दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने पाणी सोडण्यात आले असले तरी 4 दशलक्ष घनफुटपेक्षा जास्त पाणी सोलापूरकरांना मिळेल का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणी नाही.. पाणी नाही ..म्हणणार्‍या सरकारला बुधवारी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणाला पाणी सोडावे लागले. पाण्यासाठी आंदोलन करणार्‍यांची अर्वाच्य भाषेत टर उडवणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवारांना या निर्णयामुळे चपराक बसली होती. उजनीतून बारामती औद्योगिक वसाहत प्रतिदिनी 7 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करत आहे. तर बारामती नगरपरिषदेने श्रायबर डायनामिक्स डेअरीला आपली पाणीयोजना भाड्याने दिल्याने दररोज 3 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होणार आहे. त्यामुळे आपसुकच उजनीतील पाण्याचा फायदा सोलापूरकरांसह बारामतीच्या उद्योगाला होणार आहे. उजनीत सध्या उणे 16.67 टक्के पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी उणे 31.6 टक्के पाण्याची गरज आहे.

भीमा पात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते खड्डे भरल्यानंतरच उजनी धरणाकडे पाणी सरकरणार आहे.यंदा पाऊस न झाल्याने उजनीतील पाणीसाठा शून्याच्या वर येऊ शकला नाही. फक्त 4 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे भामा- आसखेड व आंद्र धरणातून उजनीपर्यंत पाणी येईपर्यंत पाण्याचे मोठ्या प्रमाणात मुरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पात्रातील खड्डे भरल्यानंतर पुढील दोन दिवसांत पाणी भिगवण (ता.इंदापूर)येथे उजनीत येण्याची शक्यता आहे.