आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च त्याग करणारे भीष्म हे अतुलनीय पण दुर्दैवी व्यक्तिमत्त्व, ‘भीष्महृदय’ ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद येथील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व लेखक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर लिखित ‘भीष्महृदय’ या ग्रंंथाचे प्रकाशन मंगळवारी  पुण्यात झाले.  या वेळी डॉ. चंद्रहास शेट्टी, दिनकर शिलेदार, डॉ. देगलूरकर, मिलिंद जोशी आणि वा. ल. मंजूळ. - Divya Marathi
औरंगाबाद येथील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व लेखक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर लिखित ‘भीष्महृदय’ या ग्रंंथाचे प्रकाशन मंगळवारी पुण्यात झाले. या वेळी डॉ. चंद्रहास शेट्टी, दिनकर शिलेदार, डॉ. देगलूरकर, मिलिंद जोशी आणि वा. ल. मंजूळ.
पुणे - आपल्या दीर्घ जीवनात कुरुकुलाच्या  वंशाचे जतन आणि सातत्य राहावे, यासाठी सर्वोच्च त्याग करणारे भीष्म हे महाभारतातील अतुलनीय पण दुर्दैवी व्यक्तिमत्त्व आहे, असे मत मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.  
 
औरंगाबाद येथील ज्येष्ठ संशोधक आणि लेखक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर लिखित ‘भीष्महृदय’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद  जोशी यांच्या  हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.  भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ, प्रकाशक दिनकर शिलेदार, लायन प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.   
 
या वेळी डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘एकत्र कुटुंबातील कर्त्या पुरुषाला  कुटुंबातील सर्वांची सुख-दु:खे, अपेक्षा, कर्तव्ये पुढाकाराने पाहावी लागतात, पण त्याच्याकडे मात्र कुणाचेच लक्ष नसते. तो दुर्लक्षित राहतो. भीष्म या व्यक्तिरेखेचे असेच काहीसे झाले आहे. एेश्वर्य, सत्ता, युवराजपद, विवाह सारे आपल्या प्रतिज्ञेमुळे नाकारणाऱ्या भीष्मांनी युद्धात मात्र कौरवांचे सेनापतिपद स्वीकारले. मनातून भीष्मांना हे युद्ध नको होते. तरी त्यांना ते लढावे लागले. कर्त्या पुरुषाची नियतीने केलेली कोंडी त्यांच्या वाट्याला आली.”
 
महाभारत  मानवी जीवनाचा आरसा  
प्रा. जोशी म्हणाले,“महाभारत हा मानवी जीवनाचा आरसा आहे. सुष्ट-दुष्ट आणि मूल्य-नियती यांच्या सीमारेषेवर भीष्मांची व्यक्तिरेखा उभी आहे. त्यांना लाभलेले दीर्घायुष्य, इच्छामरणी असल्याने लांबलेला मृत्यू, कसोटीच्या क्षणी मान खाली घालण्याची आलेली वेळ, इतरांचे दु:ख पाहून हळहळण्याखेरीज काहीच करू न शकल्याची जाणीव..असे भीष्मांचे जीवन हे वेदनेचे महाभारत म्हणावे लागेल,”. मंजूळ यांनी महाभारताच्या भांडारकर संस्थेने केलेल्या चिकित्सक आवृत्तीची माहिती सांगितली. महाभारत हा लेखकांना, संशोधकांना अक्षय्य ऊर्जा पुरवणारा ग्रंथ आहे. आजवर महाभारतावर साडेचारशेहून अधिक काव्य, नाटकांची निर्मिती झाली आहे. गीतेचे जगातील ७५ भाषांत अनुवाद झाले आहेत, असेही ते म्हणाले. शिलेदार यांनी प्रास्ताविक केले. अन्वय बेंद्रे यांनी आभार मानले.  
बातम्या आणखी आहेत...