आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्न रस्त्याचा: बोपखेल ग्रामस्थांचे अण्णांना साकडे, अमानुष मारहाणीचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बोपखेलच्या ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना येथील रस्त्याच्या प्रश्नाची आणि पोलिसांच्याकडून ग्रामस्थांवर झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती दिली. तसेच लष्कराकडून आणि पोलिसांच्याकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे अण्णा हजारे यांना साकडे घातले. हजारे यांनी ग्रामस्थांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेचा निषेध केला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास ग्रामस्थांना सांगितले. तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले.

बोपखेलमधील नागरिकांना दळणवळणासाठी बोपखेल ते दापोडी हा सीएमईतून जाणारा रस्ता सोईचा आहे. मात्र लष्कराच्या आडमुठेपणामुळे या रस्त्याचा वापर करण्यापासून बोपखेलच्या ग्रामस्थांना रोखले जात आहे. ग्रामस्थांनी स्थानिक आमदार, खासदारांपासून ते संरक्षण मंत्र्यांपर्यंत उंबरे झिजवूनही त्यांना आजतागायत न्याय मिळालेला नाही. राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी अनेकदा चर्चा करूनही कित्येक वर्षांत हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांची प्रचंड कोंडी झाली आहे.

सीएमईच्या हद्दीतील रस्ता खुला करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी 21 मे रोजी आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. महिला व लहान मुलांनाही बेदम मारहाण झाली. या प्रकरणात पोलिसांनी अनेक ग्रामस्थांना अटक करून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पाच दिवसांनंतरही बोपखेल गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. राजकीय पक्षांनी या गावाकडे जवळजवळ पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शिक्षण मंडळ सदस्य चेतन घुले, संदिप हारदे, अतुल घुले, संदिप घुले, सुभाष जोगदंड, अनिल समुद्रे, विकास वीर आणि दिलीप घुले या ग्रामस्थांनी रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी (जि. नगर) येथे जाऊन भेट घेतली. बोपखेल ग्रामस्थांवर लष्कर आणि पोलिसांच्याकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे हजारे यांना साकडे घातले. त्यांना बोपखेल ते दापोडी या सीएमईच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न नेमका काय आहे, बोपखेल ते दापोडी हा रस्ता दळणवळणासाठी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची कशी परवड होते, याबाबत ग्रामस्थांनी अण्णा हजारे यांना माहिती दिली.

नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या लष्कराकडून अडवणुकीची भूमिका घेतली जात असल्याबाबत अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच न्याय मागणाऱ्या ग्रामस्थांच्यावर पोलिसांच्याकडून अमानुषपणे लाठीमार झाल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. हजारे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडण्यास ग्रामस्थांना सांगितले. तसेच स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी बोपखेल ग्रामस्थांना दिले.
बातम्या आणखी आहेत...