आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Responsibility Due To Food Security President Pranav Mukharjee

अन्नसुरक्षा कायद्यामुळे कृषिक्षेत्रावर मोठी जबाबदारी - राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे कृषी उत्पादन घेणे हे भारतापुढे आव्हान आहे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे कृषिक्षेत्रावर आता मोठी जबाबदारी आली आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती व्यवसायात वापर केल्यास हे आव्हान आपण सहजपणे पेलू शकू,’ असा विश्वास राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी बारामती येथील कार्यक्रमात व्यक्त केला.
बारामती येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद व बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माळेगाव येथील नूतन इमारत व अत्याधुनिक सेवांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. चरणदास महंत, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. या वेळी कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल राष्‍ट्रपतींनी शरद पवार यांचे कौतुक केले.
मुखर्जी म्हणाले की, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा आपल्या देशात अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ होत आहे, ही आनंदाची बाब आहे. एकेकाळी अन्नधान्याची आयात करावी लागणारा आपला देश आज मोठ्या प्रमाणावर निर्यात करत आहे. तांदळाची सर्वाधिक निर्यात करणा-या देशांमध्ये भारताचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. साखर, कापूस यांची निर्यातही उल्लेखनीय आहे. अन्नधान्य स्वयंपाकघरापर्यंत येण्यासाठी परदेशातून येणा-या जहाजाची वाट पाहण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. ही बाब शेतकरी, कृषिक्षेत्र, कृषितज्ज्ञांसाठी अभिमानाची आहे.
वाढती लोकसंख्या व मर्यादित कृषिक्षेत्रात सर्वांना पुरेल एवढ्या अन्नधान्याचे उत्पादन करणे, हे आज आव्हान आहे. कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ व इतर कृषी संस्थांनी हे आव्हान पेलण्याची ऐतिहासिक कामगिरी करावी, अशी अपेक्षा राष्‍ट्रपतींनी व्यक्त केली.
शेतक-यांना स्वस्तात उपकरणे, सोयी-सुविधा
पवारांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित
शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षांतील कृषिविषयक भाषणांचे संकलन असलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते रविवारी झाले. ‘ट्रान्सफॉरमिंग अ‍ॅग्रिकल्चर, ट्रान्सफॉरमिंग इंडिया’ असे या पुस्तकाचे नाव आहे. त्यात पवारांचे कृषिविषयक विचार, संकल्पना मांडल्या आहेत. देशभरातील कृषी महाविद्यालयांच्या कुलगुरूंसाठी आयोजित परिषदेत हे प्रकाशन झाले.
सामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन
अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टअंतर्गत सुरू केलेल्या कृषी विज्ञान केंद्राने सामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले. केंद्राद्वारे शेतकरी व कुटुंबीयांना आधुनिक शेतीच्या सर्व सोयी-सुविधा स्वस्त दरात दिल्या जातात. या संकुलात प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीपर्यंत सुमारे 6 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री
जगाची गरज भागवू
संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. वाढत्या क्रयशक्तीमुळे अधिक फलोत्पादन आणि कृषी उत्पादनाचे आव्हान आहे. ते पेलल्यास भाजीपाला, अन्नधान्य, फळे यांची संपूर्ण जगाची गरज भागविण्याचे सामर्थ्य भारतीय कृषी व्यवस्थेला प्राप्त होऊ शकेल.
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री