आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात'आप'च्या चिरफळ्या, ३७६ कार्यकर्त्यांचे राजीनामे; यादवांसोबत जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सत्तापिपासू झाले असून त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे,' 'सत्तेने अरविंद बिघडला', अशी आरोपांची राळ उठवत आम आदमी पार्टीच्या राज्यातील ३७६ कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षातून हकालपट्टी झालेल्या योगेंद्र यादव यांच्यासोबत हे कार्यकर्ते जाणार असून, नव्या राजकीय पक्षाच्याही हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत.

पुण्यात सोमवारी राज्यातील १९ जिल्ह्यांतून आलेल्या 'आप'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी केजरीवालांनी फसवल्याचा आरोप करत सर्वांनी आप सोडण्याचा निर्णय एकमताने घेतला. येत्या ३० मेपासून 'स्वराज अभियाना'त राज्यभर कार्यक्रम घेऊन राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी करण्याचे बैठकीत ठरले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्या उपस्थितीत १४ जूनला पुण्यात फुटीरांच्या नव्या पक्षाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.

मारुती भापकर, मानव कांबळे, प्रा. भावना वासनिक, शकील अहमद, ललित बाबर, इब्राहिम खान, विक्रांत कर्णिक आदी पदाधिका-यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

स्वराज अभियान
राज्यातल्या 'आप' समर्थकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी स्वराज अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी विदर्भात ३० मे, मराठवाड्यात ३१ आणि मुंबईत १ जूनला विभागीय संवाद कार्यक्रम घेतले जातील. राष्ट्रीय पातळीवरही असे ३० संवाद कार्यक्रम होतील.