आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकोबांच्या जयघोषाने इंद्रायणीकाठ दुमदुमला, देहूनगरीत 369 वा बीज सोहळा उत्साहात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘तुका म्हणे जाऊ चालत वैकुंठा, रामकृष्णकथा हेचि वाट..’ असा जयघोष करत, टाळ-चिपळ्यांच्या साथीने आणि लक्षावधी भाविकांच्या उपस्थितीने श्रीक्षेत्र देहू गावात मंगळवारी तुकाराम बीज सोहळा अमाप उत्साहात साजरा  झाला. तुकोबांच्या नामघोषाने देहूगाव दुमदुमून गेले. परंपरेने चालत आलेला तुकोबांचा सदेह वैकुंठगमन सोहळा कीर्तनप्रसंगी साजरा झाला.   

तुकाराम बीज सोहळ्यासाठी दोन दिवसांपासून राज्याच्या सर्व भागांतून भाविकांचे जथ्थे देहूनगरीत दाखल होत होते. लक्षावधी वारकऱ्यांच्या उपस्थितीने इंद्रायणीचा काठ गजबजला होता. आठवडाभरापूर्वीपासूनच देहूमध्ये कीर्तन, भजन, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देहूमधील विठ्ठल-रुक्मिणीच्या मुख्य मंदिरात पहाटे चार वाजता महापूजा झाली. त्यानंतर अनुक्रमे शिळामंदिर, वैकुंठगमनस्थान मंदिर येथेही पूजा झाल्या. दर्शनबारीसाठी भाविकांची झुंबड सायंकाळपर्यंत होती. संस्थानचे अध्यक्ष रामदास मोरे, तसेच जालिंदर मोरे, अशोक मोरे, सुनील मोरे, अभिजित मोरे आदींची उपस्थिती होती. 

संत तुकोबांच्या पादुका ठेवलेली पालखी साडेदहा वाजता गोपाळपुऱ्याकडे निघाली. तेथून वैकुंठगमनस्थानी उभारलेल्या मंडपात परंपरेनुसार देहूकर महाराजांचे कीर्तन सुरू झाले. मध्यान्हसमय नजीक येताच वारकरी देहभान विसरून नाचू लागले. टाळ-मृदंग-चिपळ्या- वीणेचा स्वर टिपेला पोचला. ठीक मध्यान्हसमयी नांदुर्कीच्या वृक्षाची पाने सळसळली आणि तुकोबांच्या नामघोषात परिसर रंगून गेला. वारकरी भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि बीजसोहळा साजरा झाला. पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आदी सोहळ्यासाठी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...