आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Appeals Educated People For Vote For Loksabha

'चांगले सरकार निवडून आणण्यासाठी सुशिक्षितांनो घराबाहेर पडा व मतदान करा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अकार्यक्षम सरकार, महागाई, भ्रष्टाचार याविषयावर सुशिक्षित लोक फक्त बोलत राहतात मात्र मतदानाच्या दिवशी मत देण्याकरिता बाहेर पडण्यास टाळाटाळ करतात. त्याचा देशावर, समाजव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी फक्त गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदानाला घराबाहेर पडावे आणि भ्रष्ट काँग्रेसचे सरकार घालवून नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रगतीशील भारतासाठी भाजपचे सरकार निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजप मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पुणे येथे केले.
प्रोफेशनल्स ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमात भंडारी बोलत होते. याप्रसंगी भानुदास सोलापूरकर, लतिफ मगदुम, लष्करातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, लेखा परीक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवर आदी उपस्थित होते. मतदान का करावे, रस्त्यांची विकासकामे आणि त्यासाठी आकाराला जाणारे शुल्क (टोल), सामाजिक आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर यावेळी भूमिका मांडण्यात आली.
भंडारी म्हणाले, आपल्या देशात मतदार हा राजा आहे. चांगले सरकार निवडून देण्याची क्षमता सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हाती आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की सुशिक्षित मतदारच मतदानासारख्या महत्त्वाच्या लोकशाही प्रक्रियेपासून लांब राहतात. मतदानाच्या दिवशी सुशिक्षित लोक घराबाहेर पडत नाहीत. अशा सुशिक्षित लोकांनी मतदानाला टाळाटाळ केल्यामुळे योग्य उमेदवार निवडून येत नाही.
चांगले उमेदवार निवडून न आल्यामुळे त्याचा परिणाम देशावर, समाजव्यवस्थेवर होतो आहे. त्यामुळे मतदान न करता पाचपाच वर्ष केवळ सरकारची अकार्यक्षमता, महागाई, भ्रष्टाचार याविषयावर गप्पा मारण्यापेक्षा सुशिक्षित लोकांनी घराबाहेर पडावे आणि भ्रष्ट काँग्रेसचे सरकार घालवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपाचे सरकार निवडून दिले पाहिजे असे आवाहन भंडारी यांनी यावेळी केले.
मगदुम म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि मुस्लिम समाजाला दूर ठेवणे, त्यांना एकत्र येऊ न देणे हेच काँग्रेसचे एकमेव उद्दिष्ट आहे. मात्र यावेळी मुस्लिम समाज अशा अजेंड्याला बळी न पडता, सक्षम नेतृत्व देणा-या पक्षाला मतदान करणार आहे. निवृत्त लेफ्टनंट रे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, युद्धामध्ये जसे आपण देशप्रेम दाखवितो तसेच मतदान करून देशप्रेम व्यक्त झाले पाहिजे. कार्यक्रमाला उपस्थित अनेक डॉक्टर्स, सीए, अभियंते यांनी यावेळी भंडारी यांच्याशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला.