आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Complients Agianest Mns To Election Commission

\'नमो नमो\'चा जप केल्याने भाजपची मनसेला तंबी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी नमो नमो जप करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत मोदीनामाचा जप सुरु होता. एवढेच नव्हे तर मनसेचे काही कार्यकर्ते मोदींचे स्टीकर घेऊन आले होते. तसेच 'अब की बार, मोदी सरकार', 'नमो नमो', 'नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं' अशा घोषणा देत होते. याबाबत पुण्यातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून देताच प्रदेश भाजपने याबाबत मनसेला तंबी दिली आहे. तसेच याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे.
भाजपचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी मुंबई भेटीवर असलेले मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडे केली आहे. संपत निवडणूक आयोगाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. याबाबत श्रीकांत भारतीय यांनी म्हटले आहे की, मतदारांची दिशाभूल करून एखाद्याच्या नावाने मते मागणे हे लोकप्रतिनिधित्व कायद्याचा व आचारसंहितेचा भंग करणारे आहे. महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेसह इतर चार पक्षांची महायुती आहे. यात भाजपासह शिवसेना, आरपीआय (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाची महायुती आहे. याखेरीज महाराष्ट्रात इतर कोणताही पक्ष मोदी यांच्या नावाचा, घोषणांचा, प्रतिमेचा वापर करू शकत नाही, असे भारतीय यांनी मनसेला स्पष्ट बजावले आहे.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन महायुतीच्या विरोधात मनसेने उमेदवार करू नयेत. तसेच मोदींच्या पंतप्रधानपदासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मतविभाजन टाळावे अशी विनंती केली होती. त्यानंतर मनसेने पुणे व भिवंडी वगळता भाजपच्याविरोधात उमेदवार उभे केले नाहीत. तेव्हापासून भाजप आणि मनसे यांची छुपी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत भाजप, शिवसेनेसह मनसेच्या कार्यकर्त्यांत आजही संभ्रम कायम आहे. मात्र, भाजपने मनसेला स्पष्ट तंबी देत नमो नमो जयघोष बंद करण्यासाठी फटकारले आहे. आता मनसे व राज यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.