आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Swabhimani Friendship Break? Next Month Decision Possible

भाजप-स्वाभिमानीचा काडीमोड, पुढील महिन्यात राज्यस्तरीय बैठकीनंतर निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आधी मंत्रिपद व आता विधान परिषद सदस्यत्वाचीही संधी नाकारणा-या भाजपशी संबंध तोडून टाकण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांवर दबाव वाढत आहे. भाजपकडून आणखी मानहानी सहन करण्याऐवजी स्वतंत्र बाणा जपत शेतक-यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्यावी, असा विचार ‘स्वाभिमानी’त सुरू झाला आहे. त्यामुळे भाजपबरोबरची मैत्री संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा फेब्रुवारीत होणा-या राज्यस्तरीय बैठकीनंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या चार जागा भरताना भाजपने विनायक मेटे, महादेव जानकर या ‘मित्रां’ची वर्णी लावली, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना डावलले. भाजपची ही कृती ‘स्वाभिमानी’च्या दृष्टीने शेवटची काडी ठरली आहे. आधीच सत्ताधा-यांशी कुचकामी मैत्रीमुळे शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्यात अडचण येत आहे. दुस-या बाजूने सत्तेचाही लाभ मिळत नाही. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपबरोबरची मैत्री संपवण्याचा आग्रह खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्याकडे कार्यकर्त्यांनी धरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली तेव्हा शेट्टी यांनी शिवसेनेऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय ‘स्वाभिमानी’ने घेतला होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार व विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज अाहेत. ‘सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यात आमचे आयुष्य गेले आहे. आमदारकी किंवा मंत्रिपदासाठी कधीच लाचार नव्हतो. मुद्दा विश्वासघाताचा आहे. फडणवीस शब्द पाळतील असे वाटत होते. पदाच्या माध्यमातून शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यास बळ मिळाले असते. अर्थात, सत्ता नसल्याने आमच्या भूमिका बदलणार नाहीत. शेतक-यांसाठी संघर्ष सुरूच राहील,’ असे सदाभाऊ खोत म्हणाले. भाजपबरोबर राहून आणखी अपमान करून घेऊ नये, असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचे त्यांनी मान्य केले.

जातीचे राजकारण
* रामदास आठवले यांना नाराज केल्यास दलितांमध्ये स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नांना तडा जाईल, या भीतीतून आठवले यांना खासदारकी.
* धनगरांना आरक्षण देणे सोपे नसल्याचा भाजपला साक्षात्कार. त्यामुळेच धनगरांचा रोष कमी करण्यासाठी महादेव जानकरांना आमदारकी.
* पक्षांतर्गत ‘मराठा नेतृत्व' असलेल्या विनोद तावडे यांना रोखण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी विनायक मेटे उपयोगाचे असल्याने त्यांचीही विधान परिषदेवर वर्णी.
* शेतक-यांच्या प्रश्नांवर लढणा-या ‘स्वाभिमानी'ची प्रतिमा प्रामाणिक व लढाऊ असली तरी सरकारला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांना डावलणे सोपे गेले.

पुढे वाचा भाजपच्या तीन चुका