पुणे- भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष नव्हे तर शिवसेनामुक्त करायचा आहे. त्यामुळेच भाजपने दगाबाजी करीत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असा गंभीर आरोप शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केला आहे. सांगलीत एका प्रचारसभेत ते बोलत होते.
रावते म्हणाले, महाराष्ट्र शिवसेनामुक्त करण्याचा भाजपचा संकल्प असून, यासाठीच पश्चिम महाराष्ट्रातून भाजप
नरेंद्र मोदींच्या सभांचा शुभारंभ करीत आहे. मात्र, मोदींच्या सभांना यश मिळणार नाही. कपाळी अपयश घेऊन मोदी महाराष्ट्रात फिरतील. भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही. यामुळेच जाहिरातींमधून मोदींचा चेहरा पुढे केले जात असल्याचेही रावतेंनी सांगितले.
आबांची चौकशी करा- सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा आर आर पाटील यांना लक्ष्य केले आहे. आर आर हे इलेक्शन माफिया असून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी त्यात फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. आजपर्यंत आर आर हे अशाच काहीतरी भानगडी करून निवडणूका जिंकत आल्याचे संजयकाका पाटील यांनी म्हटले होते.