आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: तथाकथित संस्कृती-धर्म-देशप्रेमी अजून किती बळी घेणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद युनिवर्सिटीमध्ये गेल्या काही दिवसात 'आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन' आणि युनिवर्सिटी प्रशासन यांच्यामध्ये चाललेल्या वादात अखेर रोहित वेमुला या विद्यार्थ्याचा बळी गेला. याची सुरुवात झाली ती 'मुझफ्फरनगर बाकी है' या चित्रपटाचे सादरीकरण काही विद्यार्थ्यांनी केले तेव्हा. आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन आणि त्यांच्या काही समविचारी सहकार्यांनी सदर चित्रपटाच्या केलेल्या सादरीकरणाला अभाविप या संघटनेने आक्षेप घेतला. त्यातून या दोन संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली. अभाविपच्या एका नेत्याला मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली गेली.
इथपर्यंत मामला इतका गंभीर नव्हता. परंतु जेव्हा भाजप नेते बंडारू दत्तात्रय हे या प्रकरणात पडले तेव्हा मात्र याला गंभीर वळण लागले. दत्तात्रेय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन ही जातीयवादी व देशद्रोही संघटना असून त्यांच्यामुळे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था ही देशद्रोहाचे अड्डे बनत चालले आहेत. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. स्मृती इराणी यांनीही पडत्या फळाची आज्ञा मानून हैदराबाद युनिवर्सिटीला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र विद्यापीठाने नवीन समिती नेमून विद्यार्थ्यांना एकतर्फी दोषी घोषित केले. त्यांना देशद्रोही आणि जातीयवादी ठरवून वसतिगृहातून आणि विद्यापीठातून काढून टाकले. अनेक दिवस हे पाच विद्यार्थी आपले सामान आणि डॉ. आंबेडकरांचे एक पोस्टर घेवून विद्यापीठाच्या बाहेर रस्त्यावरच राहिले. फुटपाथवर राहून त्यांनी आपले आंदोलन पुढे चालवले.
आपणाला न्याय मिळावा म्हणून सर्वपरीने त्यांचे प्रयत्न चालू होते. अभाविपच्या एका नेत्याला मारहाण करण्याचा आरोप संबंधित विद्यार्थांवर केला गेला होता. परंतु विद्यापीठाचे सुरक्षारक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार अशी कोणतीही घटना घडली नव्हती. अभाविप आणि हे विद्यार्थी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र मारहाणीचा प्रकार कल्पोकल्पित असल्याचेच सर्वजण सांगत आहेत. असे असताना या विद्यार्थ्यांवर सुडाची कारवाई करणे योग्य नव्हते.
'मुझफ्फरनगर बाकी है' या चित्रपटाचे सादरीकरण, याकुब मेमनच्या फाशीला विरोध आणि आंबेडकरवादी विचारांचा प्रचार-प्रसार यामुळे 'अभाविप'सकट अनेक उजव्या संघटना या विद्यार्थ्यांना विरोध करत होत्या. हा संघर्ष वैचारिक पातळीवर आणि विद्यापीठ स्तरावर राहिला असता तरी ठीक होते. परंतु बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांनी सदर प्रकरणी विशेष लक्ष घालून 'आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन' आणि 'आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल'वर बंदी घालण्याचा प्रयत्न करणे सर्वस्वी चुकीचे होते. वरिष्ठ स्तरावरून होत असलेला विरोध आणि न्याय मिळण्याची शक्यता दुरापास्त झाल्यानेच रोहित वेमुला याचा बळी गेला.
हा राजकीय बळी आहेच परंतु जातीयही आहे. या प्रकरणाला जातीय रंग देवू नये असे म्हणणा-यांची कीव करावीशी वाटते. रोहितच्या आत्महत्येचे समर्थन होवू शकणार नाही मात्र त्याच्यासारख्या चळवळीत मुरलेल्या व्यक्तीला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरत नसेल तर गांभीर्याने विचार केला पाहिजे. रोहितने मरण्याआधी लिहिलेले पत्र वाचले तर तो भ्याड आणि पळपुटा नव्हता हे दिसून येते.
रोहित त्याच्या पत्रात लिहितो, "इस क्षण मैं आहत नहीं हूं. मैं दुखी नहीं हूं. मैं बस ख़ाली हूं. मुझे अपनी भी चिंता नहीं है. ये दयनीय है और यही कारण है कि मैं ऐसा कर रहा हूं." आंबेडकरी विचार प्रमाण मानून चळवळीत लढणारा रोहितसारखा खंदा कार्यकर्ता आत्महत्या करू शकतो यावर अजूनही कुणाचा विश्वास बसू शकत नाही. रोहितचा बळी गेलाच. परंतु यापुढे असे रोहित बळी जाऊ नयेत म्हणून आम्हाला काळजी घेतली पाहिजे.
'अभाविप' सारख्या स्वयंघोषित संस्कृतीरक्षक संघटनांना चाप लावला पाहिजे. समाजात कुठे काही चुकीचे होत असेल तर त्यासाठी पोलिस आणि सरकार आहे. कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याचा आणि त्यानुसार शिक्षा करण्याचा अधिकार 'अभाविप'ला कुणी दिला ? रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सर्वच संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. ज्यांच्यावर आपल्या सुरक्षेची, कल्याणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच आपणावर अन्याय होतो ही भावना समाजातील एका वर्गाला सतत डाचत असते. या वर्गाला न्याय मिळवून देवून दिलासा देण्यात सरकार शासन-प्रशासन अपयशी ठरत असेल तर यापुढेही असे शेकडो रोहित वेमुला बळी जातील याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
(लेखक प्रकाश पोळ पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. तसेच सध्या ते पुण्यात यूपीएससीची तयारी करीत आहेत.)