आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेशाही उडान भरणार्‍या ‘नीळवंता’चा राज्यात गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे, मुंबई - काळसर पंखांवरची निळी झाक आणि आतल्या पंखांवरचे लाल ठिपके, अशी वेधक रंगसंगती असणार्‍या ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’चा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अपृष्ठवंशीय कीटकवर्गही निसर्गसाखळीतला महत्त्वाचा दुवा असल्याचे अधाेरेखित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी िदली.

राज्याच्या जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर म्हणाले, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखराला मराठीमध्ये नीळवंत किंवा नीलपंख असे म्हणता येईल. या फुलपाखराची उडण्याची पद्धत राजेशाही असते. अतिशय देखणे दिसणार्‍या या फुलपाखराचे अस्तित्व समृद्ध जंगलाचे निदर्शक मानले जाते. प्रामुख्याने पश्चिम घाट परिसरात हे फुलपाखरू आढळते. राज्याला राज्यपक्षी, प्राणी, वृक्ष आणि फूल आहेतच, त्यात आता नीळवंत फुलपाखराची देखणी भर पडली, याचा आनंद वाटतो.’

फुलपाखरांचा मान वाढला
राज्यात जवळपास २२५ प्रजातीच्या फुलपाखरांची नोंद झालेली असून देशाच्या एकूण संख्येच्या १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. देशामध्ये कोणत्याही राज्याने राज्य फुलपाखरू घोषित केलेले नसून एकंदरीत फुलपाखरे ही दुर्लक्षित होती. मात्र, आता महाराष्ट्राने फुलपाखराला राज्य दर्जा दिल्यामुळे फुलपाखरांचा मान वाढला आहे.

संवर्धन हाेईल, जतनाचे महत्त्व पटेल
राज्याला राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष आणि पुष्प आहेत. ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू हे आता राज्य फुलपाखरू म्हणून जाहीर होत आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहे. यानिमित्ताने जनसामान्यांमध्ये या फुलपाखराविषयी जागृती होईल आणि संवर्धन व जतनाचे महत्त्वही पटेल. - विकास खारगे, सचिव, वने आणि महसूल

ब्ल्यू मॉरमॉनची वैशिष्ट्ये
आकार : सुमारे १२० ते १५० मिलिमीटर (१५ सेंमी)
रंग : काळसर पंखांवर निळी झाक, आतील बाजूस लाल ठिपके
वास्तव्य : प्रामुख्याने लिंबूवर्गीय वृक्ष (माकडलिंबू)
कीटकाचा प्रकार : अपृष्ठवंशीय
आढळ : पश्चिम घाट, विदर्भ, सदाहरित तसेच निमसदाहरित जंगले. भारताप्रमाणे श्रीलंकेतही दिसतात.
बातम्या आणखी आहेत...