पुणे - राज्यात मंगळवारपासून (२८ फेब्रुवारी) बारावी बाेर्डाची परीक्षा घेण्यात येत अाहे. स्पर्धा परीक्षा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, सैन्यदलातील भरतीसाठीच्या परीक्षा, विविध प्रवेशपरीक्षांना ‘पेपरफुटी’चे ग्रहण लागले असल्याने राज्य परीक्षा मंडळाने बारावी बोर्डाच्या परीक्षांदरम्यान विशेष खबरदारीचे उपाय योजले. परीक्षाकेंद्रांवर कुणालाही मोबाईल, कॅमेरा आदींची परवानगी नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केले.
लष्करातील भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचे पेपरफुटी प्रकरण ताजे असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हमाणे म्हणाले,‘बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपरफुटीची प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे परीक्षाकेंद्रांवर विद्यार्थी, पालक, अधिकारी कुणालाही मोबाईल बाळगण्याची परवानगी नाही. मोबाईलला पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. शिवाय इतर कुठल्याही माध्यमातून कॉपी होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. सारेच तपशील जाहीर करता येणार नाहीत. पण मंडळ काळजी घेत आहे.’
बारावीचे पेपर सकाळी ११ वाजता आहेत. साडेदहापर्यंत अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका केंद्रांवर न्यायची आहे. साडेदहाच्या आधी जर पेपर फुटला तरी त्याची जबाबदारी प्रश्नपत्रिका नेणाऱ्या अधिकाऱ्यांची असेल व साडेदहानंतर पेपर फुटला तर केंद्रावरील अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे म्हमाणे यांनी स्पष्ट केले.
१ लाख विद्यार्थी वाढले
बाेर्डाच्या इतिहासात यंदा प्रथमच सर्वाेच्च संख्येने विद्यार्थी परीक्षा देत अाहेत. यंदाच्या वर्षी बारावीच्या विद्यार्थीसंख्येत एकूण एक लाख १६ हजार ८९८ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.
वर्ष विद्यार्थी संख्या
२०१५ ११.९९ लाख
२०१६ १३.८८ लाख
२०१७ १५.०५ लाख