आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक नजर...!’ तलाकशुदा’चा डाग पडू नये म्हणून...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘तलाक...तलाक...तलाक’ हे शब्द कानावर पडतात आणि एका स्त्रीच्या आयुष्यावर ‘तलाकशुदा’ (घटस्फोटित) हा डाग कायमचा पडतो. या अनुभवाने पोळलेल्या महिलांचे दु:ख ‘एक नजर...तलाकनंतर’ या पुस्तकातून मांडली जात आहे. तमन्ना शेख-इनामदार यांनी लिहिलेले हे पुस्तक सत्यघटनांवर आधारित आहे.
‘ऊठसूट तलाकसारखे दुधारी शस्त्र उपसण्याआधी इतरांचे अनुभव जरा तपासून बघावेत. वितुष्ट, विसंवादाची कारणे शोधावीत. भविष्यातील तलाक टाळावेत,’ या हेतूने पुस्तक लिहिल्याचे शेख-इनामदार म्हणतात. सुमारे वीस वर्षांपासून त्या पुण्यात मुस्लिम वधू-वर सूचक मंडळ चालवतात. तेव्हापासून त्यांनी शेकडो निकाह घडताना-बिघडताना पाहिले. या अनुभवांचे पुस्तक ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. भाई वैद्य यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात प्रकाशित होत आहे.
शेख-इनामदार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘मुस्लिमांमध्ये वधू-वर सूचक मंडळे फारशी नसतात. ‘खालामाँ’ किंवा ‘मामुजान’ (घरी येऊन स्थळ सुचवणारे स्त्री, पुरुष) यांच्याकरवीच लग्ने जुळत. हे पाहून वयाच्या 27 व्या वर्षी मी पुण्यात वधू-वर सूचक मंडळ सुरू केले. ‘तलाकशुदा’चा शिक्का असलेला पीडित मुलगा-मुलगी नातेवाइकांसह दुसºया लग्नाच्या नोंदणीसाठी येतात, तेव्हा मी पहिल्या लग्नाची आणि तलाकची माहिती विचारते तेव्हा ऐकून उद्विग्न होते.’ तलाकच्या दु:खद घटनांचे वर्णन करण्याऐवजी ते होऊ नयेत यासाठीचे माझ्या अनुभवांवर आधारलेले उपाय पुस्तकातून मांडले आहेत. कोणाचे घर, आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, हीच भावना त्यामागे असल्याचे त्या म्हणाल्या.
तमन्ना शेख-इनामदार यांनी मांडले घटस्फोटित मुस्लिम स्त्रियांचे दु:ख
परखड निरीक्षणे
‘तलाकशुदा’ मुस्लिम महिलांच्या दु:खद सत्यकथा मांडत असतानाच लेखिकेने काही मते ठामपणे मांडली आहेत.
1) खरं, सत्य मार्गदर्शन करणं ही मौलाना, आलीम, हाफिज अशा व्यक्तींची जबाबदारी ठरते. समाज त्यांना आलीम म्हणजे धर्माचे जाणकार समजतो आणि हाच विश्वास काही वेळा काही लोक चुकीचा, फोल ठरवतात. मौलाना, आलीम, हाफिज ह्यांनी धर्माचा अभ्यास जरी केलेला असला तरी तीसुद्धा माणसंच असतात, हे विसरून कसं चालेल? त्यांच्या ठाई राग, लोभ, कपट, वासना, दुर्बुद्धी असतेच; पण समाज त्यांना अल्लाहचा नेक बंदा समजतो. त्यांच्यावर अविश्वास दाखवणं कठीण वाटतं.
2) धर्माचा बारकाईने अभ्यास करणारे आणि अल्लाहच्या फर्मानाला तंतोतंत पाळणारे, समजणारे, समजावणारे, खरं मार्गदर्शन करणारे काझी, मौलवी ओळखणं कठीण होऊन बसतं. एखाद्या व्यक्तीला स्वत:ला जर पूर्ण माहिती नसेल, ज्ञान नसेल तर कोणाही अर्धवट ज्ञानावर विश्वास बसतोच आणि चुकीच्या प्रथा समाजात वाढतात. काही चुकीच्या व्यक्तींच्या अयोग्य वागण्यामुळे धर्मच बदनाम होतो. यात त्या धर्माचा किंवा देवाचा दोष तो काय !
3) मुस्लिम समाजासाठी काम करणाºया संस्थेचं सर्वेक्षण वाचनात आलं, की मुस्लिम स्त्रियांना आता मौलाना, आलीमपेक्षा कायद्यावर अधिक विश्वास वाटतो, त्यामुळं लग्न रजिस्टर करण्याकडं महिलांचा अधिक कल वाढतो आहे. मुस्लिम स्त्रियांनी सुधारणेकडे टाकलेले हे एक पाऊल आहे.