आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - मज्जारज्जूला गंभीर इजा झालेला माजी सैनिक मृत्यूशी लढाई हरला, परंतु जाता-जाता स्वत:ची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) दान देऊन त्याने दोन जीव मात्र वाचवले. पुण्यातील सर्दन कमांडच्या रुग्णालयात ही कहाणी घडली. माजी सैनिक नायक वसंत नलावडे (54) यांना 19 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूलाही तीव्र इजा झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी 23 जानेवारी रोजी त्यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे जाहीर केले. दु:खाचा डोंगर बाजूला सारून नलावडे यांच्या पत्नी रत्ना यांनी ‘ब्रेन डेड’ पतीच्या किडन्या दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कडक मिलिटरी शिस्तीतले कमांड हॉस्पिटलसुद्धा क्षणभर थरारले.
सलग बारा तासांत शस्त्रक्रिया
किडनी प्रत्यारोपणात क्षणाचाही वेळ दवडता येणार नव्हता. 24 जानेवारीला ब्रिगेडियर आर. एस. व्ही. कुमार यांच्या टीमने कागदपत्रांची पूर्तता करत प्रादेशिक मूत्रपिंड रोपण समितीची मंजुरी मिळवली. ब्रिगेडियर डी. के. जैन, कर्नल एस. के. गुप्ता, कर्नल आनंद भागवत या निष्णात डॉक्टरांनी नलावडे यांच्या दोन्ही किडनी काढल्या. प्रतीक्षा यादीवरील दोन गरजू रुग्णांवर सलग बारा तासांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सैन्यातील 32 वर्षीय जवान सचिन झेंडे आणि एका दुस-या एका जवानाची 40 वर्षीय पत्नी सुमित्रादेवी अमरनाथसिंह यांना जीवदान मिळाले. किडन्यांच्या यशस्वी रोपणानंतर बुधवारी याची माहिती देण्यात आली.
मेंदू मृत केव्हा होतो?
शरीरावर नियंत्रण ठेवणारा ‘ब्रेन स्टेम’ हा मेंदूचा भाग काम करणे थांबवतो. यामुळे श्वासोच्छ्वास बंद होतो. सुधारणेची शक्यता पूर्ण मावळते. कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर) सुरू ठेवल्यास हृदय सुरू राहते, इतर अवयवांचे काम बंद राहते. यास ‘ब्रेन डेड’ म्हणतात. अवयव प्रत्यारोपण कायद्यान्वये मेंदूतज्ज्ञांसह किमान 4 डॉक्टरांचे पथक 6 तासांत रुग्णाच्या दोन चाचण्या घेते. या अहवालानंतरच ‘ब्रेन डेड’ घोषित केले जाते. व्हेंटिलेटरशिवाय रुग्ण जगणार नसतानाही कायद्यान्वये नातलगांच्या परवानगीशिवाय व्हेंटिलेटर काढता येत नाही.’ -ब्रिगेडियर डी.के. जैन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.