पुणे- टपाल खात्यापाठोपाठ आता ‘भारत संचार निगम लिमिटेड’नेही (बीएसएनएल) आधार कार्डची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘बीएसएनएल’ ग्राहक आणि सामान्यांनाही या सुविधेचा लाभ होणार आहे. पुण्यात ‘बीएसएनएल’च्या आठ सेवा केंद्रांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच ‘बीएसएनएल’तर्फे ‘आधार’ची नोंदणीही सुरू करण्यात येणार आहे.
‘बीएसएनएल’च्या पुण्यात सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, मॉडेल कॉलनी, धनकवडी, हडपसर, चिंचवड आणि भोसरी येथील ग्राहक सेवा केंद्रांवर ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली असून, लवकरच ‘बीएसएनएल’च्या पुणे, पिंपरी–चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व ग्राहक सेवा केंद्रांवर ‘आधार’ची माहिती अपडेट करण्याची यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. तसेच, ‘आधार’साठी नव्याने नोंदणीही करण्यात येणार आहे.
‘आधार’ची माहिती अपडेट करण्यासाठी प्रत्येक ग्राहक सेवा केंद्रावर वेगळी यंत्रणा बसवण्यात आली आहे. ‘बीएसएनएल’चे प्रशिक्षित अधिकारी त्यावर काम करणार आहेत.