आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमान्यांकडून धडे शिकणार की नाही? शरद पवार यांचा प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘शेती आणि शेतकऱ्यांबद्दलचे मूलगामी विचार लाेकमान्य टिळकांनी शंभर वर्षांपुर्वी मांडले. तेच आपण आजही बोलतो. मग टिळकांकडून अापण काही धडे शिकायचे की नाही?’ असा सवाल करत ‘लोकमान्यांची भूमिका डोळ्यासमोर ठेऊनच हल्लीच्या राज्यकर्त्यांनी पावले उचलली पाहिजेत,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी साेमवारी पुण्यात केेले. ‘शेतीवरचे अवलंबित्त्व कमी केले पाहिजे,’ ‘शेतीमध्ये किती लोकांनी भाग घ्यायचा? यातील काही भाग बाहेर काढायचा की नाही?,’ ‘शेतीला जोडधंदा हवा,’ ‘राष्ट्रवाद, राष्ट्रीय शिक्षण, शेती आणि उद्योग ही राष्ट्राच्या विकासाची चतुःसुत्री आहे,’ यासह टिळकांनी लिहिलेले अनेक उतारेही त्यांनी वाचून दाखवले.

पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने पवार यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिका’ने सोमवारी गौरविण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, एक लाख रूपये, शाल-श्रीफळ आणि टिळक मूर्ती या स्वरुपातील पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच ट्रस्टचे विश्वस्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘शेतीवरचा भार कमी करण्याबद्दल आम्ही आज बोलत असतो. मात्र लोकमान्यांनी सव्वाशे वर्षांपुर्वीच याबद्दलची सूत्रबद्ध विचार मांडण्याची कामगिरी केली. शेती, उद्योगधंदे आणि शेतीच्या पाण्याबद्दल त्यांनी ‘केसरी’मधून भरपूर लिहिले. सार्वजनिक हिताच्या कामांवर ब्रिटीश खर्च करत नसल्याबद्दल त्यांनी प्रखर टीका केली. रस्ते आणि रेल्वेमार्गांवर खर्च करणाऱ्या ब्रिटीशांनी पाटबंधारे व विहिरींच्या कामांवर जास्त खर्च न केल्यास दुष्काळातून बाहेर पडता येणार नाही, असे लोकमान्यांनी वारंवार खडसावले. पिके कोणती व कधी घ्यावी, शेतमालाचा भाव, पाणी व्यवस्था याबद्दल लोकमान्यांनी विस्तृत लेखन केले. शेती व शेतकऱ्यांचा विचार त्यांनी गांभिर्याने केला.’

‘टिळक आणि शाहू यांच्यातील वैचारिक संघर्ष गाजला होता. मी भाग्यवान. यंदा मला शाहुंच्या नावाचा पुरस्कार मिळाला आणि टिळकांच्याही,” अशी सुरुवात पवार यांनी केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, लोकमान्यांच्या गर्जनेचेही यंदा शताब्दी वर्ष आहे. या वर्षात हा पुरस्कार मिळतोय हा व्यक्तीगत माझा मोठा सन्मान आहे. नतमस्तक होऊन मी या पुरस्काराचा स्वीकार करतो,’ अशा भावनाही पवारांनी व्यक्त केल्या.

‘राष्ट्रवादी’ची गर्दी : अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हेमंत टकले, पुणे, पिंपरीचे महापौर-उपमहापौर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार, पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. टिळकप्रेमींच्या अलोट गर्दीने टिळक स्मारक मंदिर सभागृह फुलून गेले होते.

पवारांची मदत
‘मुंबईच्या सावरकर स्मारकाच्या उभारणीसाठी शरद पवारांनी सर्वाधिक मदत केली. जयंतराव टिळक यांनी लोकमान्यांसोबत ‘मंडाले’च्या तुरुंगात कैद भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार मुंबईत आयोजित केला होता. त्या वेळी पवार मुख्यमंत्री होते. या कार्यक्रमासाठी निधीची अडचण होती. जयंतरावांनी पवारांकडे शब्द टाकला. त्या वेळी पवारांनी भरघोस मदत केली. यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नसतात,‘ असे डॉ. दीपक टिळक म्हणाले. ‘टिळक पारितोषिका’च्या एक लाखाच्या रकमेत स्वतःच्या चार लाख रुपयांची भर टाकत पवारांनी ही रक्कमदेखील ‘संतुलन’ पाषाणशाळेला दिली.
बातम्या आणखी आहेत...