आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cartoonist R.K.Laxman Draw His Famous Common Man Cartoon At 94

९४ व्या वर्षीही ‘त्यांनी’ रेखाटला ‘कॉमन मॅन’,प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची जादू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘अंकल, ऑटोग्राफ प्लीज..’ असे विनवणारी चिमुकल्यांची फौज, शुभेच्छा देणा-या दूरध्वनींचा खणखणाट, भेटीला आलेले असंख्य पुष्पगुच्छ, चॉकलेट केकची जिभेवर रेंगाळणारी चव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती, आठवणींना मिळालेला उजाळा.. अशा भारावलेल्या वातावरणात जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे ९४ व्या वर्षातील पदार्पण गुरुवारी पुण्यात साजरे झाले.

५० वर्षांहून अधिक काळ देशातील राजकीय-सामाजिक परिस्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करणारे आर. के. लक्ष्मण यांनी २४ ऑक्टोबरला ९४ व्या वर्षात पाऊल ठेवले. ‘कॉमन मॅन’ला हीरो बनवणा-या लक्ष्मण यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी त्यांच्या औंध येथील निवासस्थानीच गुरुवारी छोटेखानी पण हृद्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठानतर्फे लक्ष्मण यांच्या काही निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शनही त्यांच्या घरी आयोजिण्यात आले होते. या वेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, निवेदक सुधीर गाडगीळ, साहित्य महामंडळाचे कोशाध्यक्ष सुनील महाजन, एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, चित्रकार चारुहास पंडित, लहू काळे, कैलास भिंगारे तसेच लक्ष्मण यांच्या पत्नी कमला लक्ष्मण उपस्थित होते.

पुणेकरांच्या कायम ऋणात : कमला लक्ष्मण
प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष संभाषणात भाग घेऊ शकत नसले तरी लक्ष्मण यांनी को-या कॅन्व्हासवर ९४ व्या वर्षीही ‘कॉमन मॅन’चे रेखाटन करून आपल्या कुंचल्याची जादू उपस्थितांना दाखवली. ‘पुणे हे आमचे घरच आहे. पुणेकरांनी आमच्यावर अमाप प्रेम केले आहे. त्या ऋणातच कायम राहायला आवडेल,’ अशी भावना त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांची आठवणींची मैफलही रंगली.