आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमन मॅन\' हरपला: प्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांचे पुण्यात निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के. लक्ष्मण (वय 94) यांचे आज सायंकाळी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झाले. मागील दहा दिवसापासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु होते. अखेर आज सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशात ओळख होती. तसेच त्यांचा कॉमन मॅन हा देशभर चर्चेचा विषय ठरला होता. 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका पार पाडली.
रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. 'हार्पर्स', 'पंच', 'ऑन पेपर', 'बॉइज', अ‍ॅटलांटिक', अमेरिकन मर्क्युरी', 'द मेरी मॅगझिन', स्ट्रॅन्ड मॅगझिन', अशी मासिके त्यांना तिथे पहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली.
मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी 'फ्री प्रेस'ची नोकरी सोडली. त्यानंतर अर्धशतकभर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते.
लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच शेवटपर्यंत राहिला. चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत. घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्षात राहतात. आसपासच्या घटना मिस्किलपणे दाखवीत असल्याने लक्ष्मण यांची चित्रे खास आहेत. त्यांच्यावर तोचतोचपणाचे आरोपही झाले, पण त्यांनी कधी चिडून कोणाला उत्तर दिले नाही. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. आर. के. लक्ष्मण हे कथालेखक व कादंबरीलेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली निबंधांची आणि प्रवासवर्णनांचीही पुस्तके आहेत.
आर. के. लक्ष्मण यांच्याबाबत आणखी वाचा पुढे...