आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"कॉमन मॅन' अबोल झाला, आर.के. लक्ष्मण कालवश, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आपल्या कुंचल्याच्या किमयेने अर्धशतकाहून अधिक काळ सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण (वय 94) यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष्मण यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, लक्ष्मण यांचे स्मारक उभारू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लक्ष्मण यांना नऊ दिवसांपूर्वी रात्री पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. वृद्धापकाळ, पक्षाघाताचा जुना विकार तसेच इतर अनेक आजारांनी घेरल्याने लक्ष्मण यांच्यावर उपचारांची शर्थ करूनही त्यांची प्राणज्योत सोमवारी मालवली. त्यांच्या मागे पत्नी कमला, मुलगा, सून व नातवंडे आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता लक्ष्मण यांचे पार्थिव सिम्बाॅयसिस संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ ‘कॉमन मॅन’च्या पुतळ्यापाशी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.