आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Help Take For Narendra Dabholkar Murder Case R.R.Patil

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाची तपास सीबीआयची मदत घेऊ - आर.आर.पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांचा शोध घेण्यात पाच महिन्यानंतरही स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेला यश आलेले नाही. त्यामुळे हतबल झालेले राज्य सरकार आता सीबीआयची मदत घेण्याच्या भूमिकेपर्यंत आले आहे. यापूर्वी स्थानिक पोलिसच तपास करतील, अशा भूमिकेवर अडून बसलेल्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी ‘सदर तपास प्रतिष्ठेचा न करता सीबीआयची मदत घेऊ,’ असे सूतोवाच पुण्यात केले.
पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, दाभोलकर खून प्रकरणाचा तपास थंडावलेला नसून पोलिसही स्वस्थ बसलेले नाहीत. तपासाकरिता तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जात असून केंद्रीय तपास यंत्रणाशींही समन्वय साधण्यात आला आहे. राज्याचे जनमानस तपास लवकर लागावा याकरिता आग्रही आहे. हा तपास काही महिन्यांच्या मुदतच नव्हे काही दिवसांमध्ये लागला पाहिजे. सदर तपासाला प्राधान्य असून सीबीआयला याकामी जे सहकार्य लागेल ते उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सतीश शेट्टीप्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आयआरबी कंपनीचा हात असून स्थानिक पोलिसांचीही आरोपीला मदत झाल्याचे सीबीआयने उच्च न्यायालयात सांगितले आहे. याबाबत गृहमंत्री पाटील म्हणाले, सदर प्रकरणाची मी माहिती घेईल व सीबीआयचे कारवाईतील सर्व अडथळे दूर केले जातील. यात जे पोलिस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. सीबीआयने संपर्क साधल्यास त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील.
टोलबाबत भाजपची भूमिका दुटप्पीपणाची
युतीच्या काळातच राज्यात टोल वसुली सुरू झाली. मात्र आता भाजपच त्याला विरोध करत आहे. लोकशाहीत माणसे बोलतात का खुर्च्या? हेच समजेनासे झाले आहे. भाजपशासित राज्यात टोल बंदी अथवा वीज माफी नाही. त्यांच्या विरोधामुळे राज्याचे विकासावर परिणाम होतो आहे. कोल्हापूरला पोलिसांचा वापर मालमत्ता रक्षणाकरिता न होता टोलनाक्यावरील सुरक्षेकरिता होत असल्याचे पाटील म्हणाले. शरद पवार हे लोकसभेला जे उमेदवार देतील त्यांना लोकसभा निवडणूक लढवावीच लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट काम करणा-या पोलिसांना वेतनवाढ
पुणे । राज्यातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती केल्याने आता अपघातांची संख्या कमी झाली आहे. यापुढील काळात जे वाहतूक पोलिस उत्कृष्ट काम करतील त्यांना विशेष वेतन वाढ दिली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शुक्रवारी केली. महामार्ग पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे शहर व ग्रामीण पोलिस यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्‍ट्र राज्य रस्ता सुरक्षा
अभियानच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, वाहन परवाने सोप्या पद्धतीने दिले जात असतानाही पैसा असणा-यांना ते तत्काळ मिळतात हे दुर्दैव आहे. रस्त्यावरील 70 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होत असून चुकीच्या लोकांना परवाने मिळत आहेत. एजंटकडे पाहून परवाने वाटप करू नये. वाहतूक पोलिसांचे हात चुकीच्या कामांना पुढे करण्यासाठी नसून कायदे मोडणा-यांना पकडण्यासाठी आहेत, हे विसरू नका. परिवहन विभाग केवळ कर गोळा करण्यासाठी नसून त्यांनी जनता सुरक्षेकडेही लक्ष द्यावे.