पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिन्यांचा काळ लोटला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) या घटनेचा आठ महिन्यांपासून तपास करत आहे. मात्र, त्यात काहीच प्रगती नाही. सीबीआय अधिका-याने मुंबईतून तपास न करता पुण्यात येऊन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले आहे.
डॉ. हमीद म्हणाले, सीबीआयचे अधिकारी या घटनेचा तपास मुंबईतून करत आहेत. पुण्यात घडलेल्या या घटनेचा मुंबईत बसून वेगाने तपास शक्य नाही. ते स्वत:हून आम्हास माहिती देत नाहीत. त्यांनी चार महिन्यांपूर्वी फक्त माझा जबाब नोंदवून घेतला आहे. ७ ते ८ वेळा आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्नही केला; पण तपासकार्य समाधानकारक वाटत नाही. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा भेटून तपास वेगाने केला जावा याकरिता विनवणी केली. पंतप्रधान व सीबीआय संचालक यांना तपासात लक्ष घालावे, याबाबतचे पत्र दिले आहे. सांगितले. राज्यात जादूटोणा कायदाची कडक अंमलबजावणी व्हावी व जातपंचायतविरोधी कायदा तातडीने करण्यात यावा, याविषयी भूमिका मांडण्यासाठी बैठकीची वेळ मागितली आहे, मात्र अद्याप तशी वेळ देण्यात आलेली नाही, असेही हमीद दाभोलकरांनी या वेळी सांगितले.
जातपंचायतविरोधी कायदा करण्यात यावा याकरिता ८ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात जातपंचायतीस मूठमाती परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अंनिसचे रिंगण नाट्य
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास वेगाने व्हावा तसेच केंद्रीय स्तरावर जादूटोणाविरोधी कायदा करण्यात यावा याकरिता अंनिसचे शिष्टमंडळ १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत पंतप्रधान व गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहे. त्या वेळी दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हा हिंदी भाषेतील रिंगण नाट्य प्रयोग सादर करणार असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.